बांगलादेशला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले त्यामुळे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होड्स यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा करार बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून स्थगित करण्यात आला आहे.

बांगलादेशचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला नसला तरी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांची कामगिरी लक्षणीय झाली होती. शाकिब अल हसनने यंदाच्या विश्वचषकात ८६.५७च्या सरासरीने एकूण ६०६ धावा आणि ११ बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली.

‘‘बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि स्टीव्ह ऱ्होड्स यांनी परस्पर संमतीने करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या उत्तरार्धात बांगलादेशचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे,’’ असे संघटनेचे मुख्य अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले.

वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांच्या करारातही वाढ करण्यात आलेली नाही. वॉल्श ऑगस्ट २०१६, तर जोशी ऑगस्ट २०१७पासून बांगलादेशशी करारबद्ध होते.