बांगलादेशी क्रिकेट संघाचे Development Coach आणि माजी खेळाडू अशिकूर रेहमान यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. गुरुवारी रेहमान यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“मला सर्वप्रथम काय झालंय तेच समजलं नाही. सुरुवातीला असं वाटलं की मला टॉन्सिल्सचा त्रास होतोय. सुरुवातीला घश्याचा त्रास व्हायला लागला, पण हळुहळु तापही आला. काही दिवसांनी छातीत दुखायला लागल्यानंतर मी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माझी चाचणी करुन घेतली आणि सोमवारी या चाचणीचा अहवाल आला ज्यात मला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय.” रेहमान यांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. रेहमान यांनी बांगलादेशकडून १५ स्थानिक आणि १८ अ श्रेणीचे सामने खेळले आहेत.

२००२ साली रेहमान बांगलादेशच्या १९ वर्षाखालील संघाचे सदस्य होते, मात्र बांगलादेशच्या प्रमुख संघात त्यांना कधीही संधी मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये फलंदाजीसोबत गोलंदाजीतही रेहमान यांची कामगिरी आश्वासक राहिलेली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर रेहमान प्रशिक्षणाकडे वळले, याआधी बांगलादेशी महिला संघासाठी त्यांनी सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलेलं आहे.