उत्कंठापूर्ण लढतीत बंगळुरू बीस्ट संघाने पुणेरी पेशवाज संघाचा ८५-७८ असा केवळ सात गुणांनी पराभव केला आणि प्रो बास्केटबॉल लीगमध्ये झकास सलामी केली. अन्य लढतीत चेन्नई स्लॅम संघाने हैद्राबाद स्काय संघाला ८३-६८ असे हरविले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत बंगळुरू व पुणे यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना ७४-७४ अशी बरोबरी होती. मात्र नंतर रघुराम या अनुभवी खेळाडूच्या आक्रमक खेळाच्या जोरावर बंगळुरू संघाने आघाडी घेतली व शेवटपर्यंत टिकविली. त्यांच्या विजयात सोमवीरसिंग, रघुराम, विसु पलानी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे संघाकडून नरेंद्र ग्रेवाल, सिद्धार्थ शिंदे व अजिंक्य माने यांची लढत अपुरी ठरली. चेन्नई संघाने हैद्राबादविरुद्ध अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. त्यांच्या विजयात आशुतोष राय, गोपाळकुमार व ए.चक्रवेलु यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. पराभूत संघाकडून महेशकुमार, हिमांशु जांगरा व मोनिश विल्सन हे चमकले.