फ्रेंच ओपनमध्ये पहिले एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबरेरा क्रेजिकोव्हाने महिलांमध्ये दुहेरीचे विजेतपदही खिशात टाकले. २००० मधील मेरी पियर्सनंतर अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हाने कतरिना सिनाकोव्हाला सोबत घेत अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्वितेक आणि अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्सचा ६-४, ६-२ असा पराभव केला.

क्रेजिकोव्हा आणि कतरिना सिनाकोव्हाचे हे फ्रेंच ओपनमधील दुसरे विजेतेपद आहे. २०१८मध्ये या दोघांनी फ्रेंच ओपनच्या दुहेरीचे जेतेपद पटकावले होते, तर २०१३मध्ये त्यांनी पॅरिसमध्ये ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. बिगरमानांकित क्रेजिकोव्हाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाला हरवून कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली.

 

 

हेही वाचा – बापरे..! चर्चेत असलेल्या क्रिकेट लीगमध्ये हाणामारी, अधिकारी जखमी

फिलिपे चॅट्रियर कोर्टवर एक तास, ५८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अंतिम लढतीत क्रेजिकोव्हाने पाव्हल्यूचेन्कोवावर ६-१, २-६, ६-४ असा विजय मिळवला. तब्बल ४० वर्षांनंतर एका चेक प्रजासत्ताकच्या महिलेने हे विजेतेपद जिंकले.

पुरुष दुहेरीत माहूत-हर्बट जोडीला जेतेपद

फ्रेंच टेनिसपटू निकोलस माहूत आणि पियरे-ह्यूज हर्बट यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले. हर्बट आणि माहुतच्या जोडीने कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिक आणि आंद्रे गोलुदेवला ४-६, ७-६(१), ६-४ असे हरवत स्पर्धेचे दुसर्‍यांदा जेतेपद पटकावले.