विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. गुरुवारपासून दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र प्रेक्षकसंख्येच्या निकषांमध्ये प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाने भारत-विंडीज मालिकेला धोबीपछाड दिला आहे. वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजणाऱ्या BARC (Broadcast Audience Research Council India) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रो-कबड्डीचे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही भारत विरुद्ध विंडीज विरुद्ध मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येच्या अधिक आहे. ऑगस्ट ३ ते ९ या कालावधीतली आकडेवारी BARC ने जाहीर केली आहे.

Star Sports 1 Hindi या वाहिनीने सर्वोत्तम ५ स्थानांमध्ये आपलं प्राबल्य कायम राखलं आहे.

सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळवणाऱ्या क्रीडा वाहिन्यांच्या यादीत Sony Ten 3 वाहिनीने थोड्या अंतराने पहिलं स्थान पटकावलं आहे. मात्र प्रो-कबड्डी सामन्यांचं प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports वाहिनीनेही आपला प्रेक्षकवर्ग कायम राखला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही वाहिन्यांमधली स्पर्धा चुरशीची होणार आहे.

वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार Sony Ten वाहिनीकडे आहेत. टी-२० आणि वन-डे मालिकेत भारतीय संघाने आश्वासक कामगिरी करत मालिकेत बाजी मारली आहे. कर्णधार विराट कोहलीनेही आतापर्यंत वन-डे मालिकेत २ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो यावरुनही Sony Ten वाहिनी आपली प्रेक्षकसंख्या कायम राखते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.