अल्वेसचा २-१ असा खळबळजनक विजय

गेल्या हंगामात दमदार प्रदर्शनाच्या बळावर अव्वल गटात बढती मिळालेल्या अल्वेस संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाला नमवत २-१ अशा सनसनाटी विजयाची नोंद केली. बार्सिलोनाचे व्यवस्थापक ल्युइस एन्रिक यांनी संघातून लिओनेल मेस्सी आणि ल्युइस सुआरेझ यांना वगळले होते. या दोघांसह संघात झालेल्या सात बदलांचा फटका बार्सिलोनाला बसला. अन्य लढतीत रिअल माद्रिद संघाने ओसास्युना संघावर ५-२ अशी मात केली.

किको फेमेनिआच्या क्रॉसवर देयव्हरसनने गोल करीत अल्वेसचे खाते उघडले. गोल करीत बरोबरी करून देण्याची संधी नेयमारकडे होती. मात्र त्याचा हेडरचा प्रयत्न चुकला. विश्रांतीनंतर लगेचच जेरेमी मॅथ्यूने गोल केला आणि बार्सिलोनाने बरोबरी केली. दुखापतीतून सावरत असणाऱ्या मेस्सीला एन्रिक यांनी पाचारण केले. मात्र गोमेझने बार्सिलोनाच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवत संघाला आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळात चेंडूवर नियंत्रण राखत आणि बार्सिलोनाच्या आघाडीपटूंना थोपवत अल्वेसने बाजी मारली.

अन्य लढतीत, दोन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाचच मिनिटांत गोल केला. डॅनिलो, रामोस, पेपे आणि मॉड्रिक यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओसास्युनातर्फे रिअरा आणि गार्सिआ यांनी प्रत्येकी एक गोल केला. रिअलने ला लिगा स्पर्धेत सलग १५ विजयांची नोंद केली.