दमदार सांघिक कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अल्मेरियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. अन्य लढतीत रिअल माद्रिदने अ‍ॅटलेटिको माद्रिदशी २-२ अशी बरोबरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
काही दिवसांपूर्वीच बार्सिलोनाला रिअल सोसिदादकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात योजनाबद्ध खेळ करत बार्सिलोनाने अल्मेरियाला निष्प्रभ केले. ८ व्या मिनिटाला अलेक्स सँचेझने बार्सिलोनातर्फे पहिला गोल केला. बार्सिलोनाचा हुकमी एक्का लिओनेल मेस्सीने २५ यार्डावरून शानदार गोल करत संघाची आघाडी बळकट केली. गेल्या सहा लढतींतला मेस्सीचा हा आठवा गोल आहे. यानंतर तीनच मिनिटांनंतर अल्मेरियाच्या अँजेल ट्रय़ुजिलोने बार्सिलोनाच्या सैलावलेल्या बचावाचा फायदा उठवत गोल केला. बरोबरी करण्याची संधी अल्मेरियाच्या संघाला होती मात्र अलेक्स विडालचा फटका थेट बार्सिलोनाचा गोलरक्षक व्हिक्टर व्हाल्देसच्या हातात विसावला.
८३व्या मिनिटाला मेस्सीच्या भरकटलेल्या हेडरचा उपयोग करून घेत कालरेस प्युओलने गोल केला. सामना संपण्यासाठी एक मिनीट बाकी असताना झेव्हीने गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निर्णायक गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली. ही लढत बरोबरीत सोडवत रिअल माद्रिदने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले. तिसऱ्याच मिनिटाला गोल करत करिम बेन्झामाने अँजेल डि मारियाच्या क्रॉसवर गोल करत रिअलला चांगली सुरुवात करून दिली. मात्र या गोलनंतर त्यांचा खेळ मंदावला. २८व्या मिनिटाला कोकने अ‍ॅटलेटिकोला बरोबरी करून दिली.
मध्यंतराला काही सेंकद बाकी असताना अ‍ॅटलेटिकोतर्फे गाबीने गोल करत अ‍ॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर अ‍ॅटलेटिकोने रिअल माद्रिदच्या आक्रमणाला थोपवत संयमी खेळ केला. निर्णायक आघाडीसह अ‍ॅटलेटिको सनसनाटी विजय मिळवणार असे चित्र असताना ८२व्या मिनिटाला रोनाल्डोने सगळा अनुभव पणाला लावत सुरेख गोल केला.

मॅराडोनाइतकी उंची मेस्सी गाठू शकणार नाही -हेक्टर
लानूस (अर्जेटिना) : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्यापेक्षा कोणताही खेळाडू सरस होऊ शकत नाही. अर्जेटिनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला मॅराडोनाइतकी उंची गाठता येणार नाही, असे अर्जेटिनाला १९८६चा फिफा विश्वचषक जिंकून देणारे दिग्गज फुटबॉलपटू हेक्टर एन्रिक यांनी सांगितले.
जगातील महान फुटबॉलपटू म्हणून २६ वर्षीय मेस्सीची ख्याती असून त्याने चार वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या बलॉन डी’ऑर पुरस्कारावर नाव कोरले आहे. पण हेक्टर यांच्या मते, मेस्सी हा मॅराडोना यांच्यापेक्षा सरस होऊच शकत नाही. ‘‘मॅराडोनाइतके यश मेस्सी मिळवू शकलेला नाही. मॅराडोनाने देशासाठी जे केले आहे, तितके मेस्सीला करता आलेले नाही. मेस्सीचा खेळ मला आवडतो. माझा मुलगा मेस्सीच्या क्षमतेपेक्षा एक टक्का जरी कामगिरी करू शकला, तर मला आनंदच होईल. पण मॅराडोना हे अद्वितीय आहेत,’’ असेही हेक्टर यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘मेस्सीने यापुढे तीन वेळा विश्वचषक जिंकून दिले तरी मॅराडोनासारखा फुटबॉलपटू कोणीच होऊ शकत नाही. मॅराडोना आणि मेस्सी ही मैदानावरील दोन विभिन्न व्यक्तिमत्त्वे आहेत. आत्मविश्वासपूर्ण मॅराडोना हे दुसऱ्यांनाही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देत असत. मेस्सी मात्र एकटाच चांगली कामगिरी साकारतो.’’