उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात बार्सिलोनाची लिव्हरपूलवर ३-० अशी मात

बार्सिलोना : ज्या वेळी संघ अडचणीत असतो, त्या वेळी संघाला सर्वाधिक अनुभवी खेळाडूंची गरज भासते. काही दिवसांपूर्वीच बार्सिलोनाला ला लिगा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या विश्वातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेसीने बुधवारी रात्री अनुभवाच्याच जोरावर पुन्हा एकदा संघाला तारले. चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत मेसीने अखेरच्या सत्रात केलेल्या दोन गोलला लुइस सुआरेझच्या एका गोलची साथ लाभल्यामुळे बार्सिलोनाने गतउपविजेत्या लिव्हरपूलवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला.

मेसी आणि सुआरेझ या अनुभवी जोडीचा ‘गोलधडाका’ सुरू असताना मोहम्मद सलाहला फारशी चमक दाखवता न आल्याने लिव्हरपूल चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. या पराभवामुळे लिव्हरपूलला ८ मे रोजी घरच्या मैदानावर होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात बार्सिलोनाला किमान ४-० अशा फरकाने पराभूत करावे लागेल.

संपूर्ण सामन्यात चेंडूवर फक्त ४८ टक्के नियंत्रण मिळवूनही बार्सिलोनाने सरशी साधली. सुरुवातीपासून आक्रमणावर भर देणाऱ्या बार्सिलोनाने सातव्या मिनिटाला आघाडी घेण्याची संधी गमावली. फिलिप कुटिन्होने मारलेला फटका गोलजाळ्याच्या किंचित वरून गेला.

२६व्या मिनिटाला सुआरेझने जॉर्डी अल्बाने दिलेल्या पासचे गोलमध्ये रूपांतर करून बार्सिलोनासाठी सामन्यातील तसेच यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील वैयक्तिक पहिला गोल झळकावला. यानंतर लिव्हरपूलच्या सॅडिओ मॅने व सलाह यांनी सुरेख चाल रचत दोन वेळा गोलजाळ्याचा वेध घेतला. मात्र दोन्ही वेळेस त्यांना अपयश आले. त्यामुळे बार्सिलोनाने पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी कायम राखली.

दुसऱ्या सत्रात लिव्हरपूलने जोरदार पुनरागमन करत बार्सिलोनाच्या गोलजाळ्यावर सतत हल्ले केले. जेम्स मिल्नरने लगावलेला अफलातून फटका बार्सिलोनाचा गोलरक्षक आंद्रे स्टेगनने हवेत झेप घेऊन अडवला. ७५व्या मिनिटाला सुआरेझने संघासाठी दुसरा गोल करण्याच्या प्रयत्नात टोलवलेला चेंडू क्रॉसबारला लागून मेसीकडे विसावला. मेसीला अडवण्यासाठी त्याच्याभोवती फारसे बचावपटू नसल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता चेंडूला सुरेखरीत्या गोलजाळ्याची दिशा दाखवून बार्सिलोनासाठी वैयक्तिक ५९९वा गोल नोंदवला.

त्यानंतर सात मिनिटांनी मात्र मेसीने अव्वल दर्जाच्या खेळाचे दर्शन घडवले. फॅबिने तेवरेसने मेसीच्या मार्गात अडथळा आणल्यामुळे बार्सिलोनाना तब्बल ३० यार्डावरून फ्रि किक बहाल करण्यात आली. मेसीने गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकरला चकवत गोलजाळ्याच्या दिशेने अनेक वळणे घेत भिरकावलेला चेंडू डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

या गोलनंतर मेसी आणि संघसहकाऱ्यांनी सामना जिंकण्याच्या आवेशात जल्लोष केला. ८४व्या मिनिटाला लिव्हरपूलला प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल करण्याची नामी संधी चालून आली होती, मात्र सलाहने लगावलेला हा फटका पुन्हा गोलजाळ्याच्या बाजूने गेला आणि बार्सिलोनाचा विजय निश्चित झाला.

६०० मेसीने या सामन्यात झळकावलेला दुसरा गोल हा बार्सिलोनासाठी त्याचा ६००वा गोल ठरला.

१४ १४ वर्षांपूर्वी म्हणजेच १ मे, २००५ रोजी मेसीने बार्सिलोनासाठी कारकीर्दीतील पहिला गोल नोंदवला होता.

४७ -२७ मेसी आणि सुआरेझ यांनी यंदाच्या हंगामातील सर्व स्पर्धामध्ये मिळून आतापर्यंत अनुक्रमे ४७ व २७ गोल नोंदवले आहेत.

०-३ चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात लिव्हरपूलला दुसऱ्यांदा ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. यापूर्वी २०१४मध्ये रेयाल माद्रिदने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती.

बार्सिलोना            लिव्हरपूल 

      ३                         ०

सुआरेझ २६

‘मेसी ७५’+८२’

मेसीला रोखणे अशक्य आहे. त्याने या सामन्यात ३० यार्डावरून केलेला दुसरा गोल तो सर्वोत्तम का आहे, हे सिद्ध करतो. मला संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.

– जुर्गन क्लॉप, लिव्हरपूलचे प्रशिक्षक

आम्ही हा सामना ४-० असा जिंकू शकलो असतो; परंतु ३-० अशा विजयामुळेसुद्धा मी आनंदी आहे. यामध्ये माझ्या एकटय़ाचेच योगदान नसून आम्ही सांघिक कामगिरीच्या बळावर हा विजय मिळवला आहे.

– लिओनेल मेसी, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू