लिओनेल मेस्सीच्या दोन शानदार गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत सेव्हिलावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. अल्बटरे मोरेनाच्या गोलद्वारे सेव्हिलाने आगेकूच केली.
सामना सुरू झाल्यानंतर लगेचच झालेल्या आक्रमणाने पिछाडीवर पडलेल्या बार्सिलोनासाठी पहिला गोल अ‍ॅलेक्स सँचेझने केला. मेस्सीने दिलेल्या फ्री-किकचा उपयोग करीत सँचेझने गोल केला मात्र तो ऑफसाइड क्षेत्रात असल्याचे नंतर स्पष्ट झाले. या गोलसाठी सुरेख पास देणाऱ्या मेस्सीने त्यानंतर हाफव्हॉलीवर कौशल्याने गोल करीत मध्यंतराला बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. ५६व्या मिनिटाला मेस्सीने आणखी एक गोल करीत बार्सिलोनाची आघाडी बळकट केली. सामना संपायला काही मिनिटे असताना सेक फॅब्रेगसने गोल करीत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुणतालिकेत रिअल माद्रिद, अ‍ॅटलेटिको माद्रिदसह बार्सिलोनाचे ५७ गुण आहेत, मात्र गोलसंख्येच्या निकषावर बार्सिलोना अव्वल स्थानी आहे.
प्रतिकूल हवामानात खेळल्या गेलेल्या या लढतीच्या पहिल्या सत्रात बार्सिलोनाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. चेंडूवर नियंत्रण मिळवण्यातही त्यांच्या खेळाडूंना अडचणी आल्या, मात्र मेस्सीने सारा अनुभव पणाला लावत आपल्या खेळाच्या माध्यमातून बार्सिलोनाला अडचणीतून बाहेर काढले.
बार्सिलोनाच्या खेळाडूंना लय गवसल्यानंतर त्यांना रोखणे सेव्हिलाच्या बचावपटूंना कठीण झाले आणि त्यांना आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.