दोन गोल करणाऱ्या लिओनेल मेस्सीने या मोसमाची शानदार सुरुवात करत धडाकेबाज पुनरागमन केले. त्याच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गेटाफेवर दुसऱ्या टप्प्यात २-० असा विजय मिळवून आगेकूच केली.
पहिल्या सत्रातच नेयमारला दुखापतीमुळे मैदानाबाहेर परतावे लागले. गेले कित्येक सामन्यांत नेयमारला विश्रांती दिली असूनही पुनरागमनाच्या सामन्यात त्याला पुन्हा दुखापतीला सामोरे जावे लागल्याने बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांच्या डोळ्यात पाणी आले. पहिल्या टप्प्याच्या सामन्यात ४-० अशी आघाडी घेतल्यामुळे मार्टिनो यांनी बार्सिलोना संघात तब्बल नऊ बदल केले होते. मार्टिनो यांनी झावी हेर्नाडेझला बार्सिलोनातर्फे ७००वा सामना खेळण्याची संधी दिली होती. ७०व्या मिनिटाला तो मैदानावर उतरला. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी मेस्सीने ख्रिस्तियान टेलोच्या क्रॉसवर पहिला गोल झळकावला. ६० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर मेस्सीने गेटाफेच्या तीन बचावरक्षकांना भेदून गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर गोलरक्षक जॉर्डी कोडिना याला चकवून दुसरा गोल केला. ८५व्या मिनिटाला मेस्सीला हॅट्ट्रिक साजरी करण्याची संधी होती. पण उजव्या बाजूने गोलक्षेत्राच्या दिशेने कूच करणाऱ्या मेस्सीचा फटका कोडिना याने अडवला.