मेसीचे दोन गोल; सेल्टा व्हिगोवर ५-० असा विजय 

लिओनेल मेसी, जॉर्डी अ‍ॅल्बा, लुईस सुआरेझ आणि इव्हान रॅकिटिक यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोना क्लबने शुक्रवारी सेल्टा व्हिगोवर ५-० असा विजय मिळवला आणि कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. मेसीने दोन गोल करून क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या फिलीप कुटिन्होचे जोरदार स्वागत केले. लिव्हरपूल क्लबकडून बार्सिलोनामध्ये सहभागी झालेला कुटिन्हो काळ्या रंगाचे ठिपके असलेला पांढरा टी-शर्ट घालून प्रेक्षकांमध्ये या लढतीचा आस्वाद घेत होता.

बार्सिलोना आणि सेल्टा व्हिगो यांच्यातील पहिली लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीसाठी दोन्ही क्लबना समान संधी होती. मात्र, घरच्या मैदानावर खेळताना बार्सिलोनाने आपले वर्चस्व सिद्ध केले. मेसीने (१३ व १५ मि.) अवघ्या १५ मिनिटांत बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

या दोन्ही संधी अ‍ॅल्बाने निर्माण केल्या होत्या. त्यापाठोपाठ अ‍ॅल्बा (२८ मि.) आणि सुआरेझ (३१ मि.) यांनी गोलधडाका लावत पहिल्या सत्रात बार्सिलोनाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘‘पहिल्या सत्रातील खेळ अप्रतिम झाला,’’ अशी प्रतिक्रिया बार्सिलोनाचे प्रशिक्षक इन्रेस्टो व्हॅलव्हेर्डे यांनी दिली. ८७व्या मिनिटाला रॅकिटिकने त्यात भर घालून बार्सिलोनाचा ५-० असा विजय निश्चित केला.