ला लीगा फुटबॉल स्पध्रेतील गतविजेत्या बार्सिलोनाला यंदाच्या हंगामात गेल्या चार लढतींत तिसऱ्यांदा अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. तुलनेले दुबळ्या असलेल्या इस्पान्योल क्लबने गतविजेत्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. इस्पान्योल क्लबने या सामन्यात २२ चुका करूनही बार्सिनोलाला विजय मिळवण्यात अपयश आले. या निकालामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानावरील बार्सिलोनाची पकड ढिली झाली. त्याचा फायदा मात्र अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबला झाला. शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अ‍ॅटलेटिकोने लेव्हँट क्लबवर १-० असा विजय मिळवत अव्वल स्थानावर मुसंडी मारली. अ‍ॅटलेटिकोने (४१) दोन गुणांची आघाडी घेतली आहे.
लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार ही जगातील आघाडीपटूंची फौज असूनही इस्पान्योलने त्यांना रोखले. मेस्सी आणि सुआरेझ यांचे गोल करण्याचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरल्याने यजमान इस्पान्योलचा आत्मविश्वास अधिक उंचावला. त्यांनी सामन्यावर मजबूत पकड घेत बार्सिलोनाला गोलशून्य बरोबरीवर रोखले.