चॅम्पियन्स लीग फुटबॉल

बार्सिलोनाने मंगळवारी इंटर मिलानविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली तरी त्यांनी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळवले. बार्सिलोनाने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले. माल्कमने ८३व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने आघाडी घेतली. पण चार मिनिटांनी मौरो इकार्डीनच्या अप्रतिम गोलमुळे इंटर मिलानने बरोबरी साधली.

‘‘आम्ही जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळलो. बार्सिलोनाने त्यांच्या नेहमीच्या शैलीने खेळ करत सामन्यावर प्रभुत्व मिळवले. मात्र आम्ही हार न मानता अखेपर्यंत किल्ला लढवला. सुदैवाने मला गोल करण्यात यश आले,’’ असे इकार्डीने सामना संपल्यानंतर सांगितले.

लिओनेल मेसीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाने या सामन्यात तीन गुण मिळवण्याच्या दिशेने सुरुवात केली होती. ओसमाने डेम्बेले याने सुरुवातीलाच मिलानचा गोलरक्षक हँडनोव्हिकला आव्हान दिले होते. १९व्या मिनिटाला लुइस सुआरेझने मारलेला फटकाही हँडनोव्हिकने अडवला. पहिल्या सत्रातील काही मिनिटांचा खेळ असताना इव्हान राकिटिकने गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला, पण हँडनोव्हिकने तो परतवून लावला.

८३व्या मिनिटाला माल्कमने उजव्या बाजूने मार्गक्रमण करत इंटर मिलानच्या गोलक्षेत्रात मजल मारली. त्यानंतर प्रतिस्पर्धी बचावपटूंच्या मधून मारलेला फटका गोलरक्षकाला चकवून गोलजाळ्यात गेला. या सामन्यात बरोबरीसह बार्सिलोनाने एका गुणाची कमाई केली असली तरी याआधीचे तिन्ही सामने जिंकून बार्सिलोनाने १० गुणांसह ब गटात अव्वल स्थान पटकावून उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.