युएफा चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावण्याचे पॅरिस सेंट जर्मनी (पीएसजी) संघाचे स्वप्न पुन्हा एकदा बार्सिलोनाने भंग केले. गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीग सामन्यात बार्सिलोनाने ३-१ अशा फरकाने पीएसजी संघाचा पराभव केला.
मध्यंतरानंतर लुइस सुआरेझच्या झंझावाताने बार्सिलोनाला विजय मिळवून देत उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित केले आहे. सुआरेझने दोन, तर नेयमारने एक गोल केला. पाहुण्या बार्सिलोना संघाने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. १८व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने दिलेल्या पासवर नेयमारने गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. यजमान पीएसजीच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत नेयमारने हा गोल केला. या गोलनंतर यजमानांनी हुकमी एक्का डेव्हिड लुइसला थिएगो सिल्व्हाच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. २५व्या मिनिटाला बार्सिलोनाला दुसरा गोल करण्याची संधी होती, परंतु पीएसजीचा आघाडीपटू एडिसन कवानीने अप्रतिमरीत्या चेंडू अडवला. कवानीच्या या प्रयत्नानंतर पीएसजीचे आक्रमण अधिक वाढले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाला केवळ १-० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आपापल्या खेळात बदल केला आणि अधिक आक्रमक पवित्रा वापरला. ५२व्या मिनिटाला अ‍ॅण्ड्रेस इनिएस्टा लुजानला दुखापत झाल्यामुळे बार्सिलोनाने झाव्हीला पाचारण केले. दोनच मिनिटानंतर मेस्सीला पिवळे कार्ड दाखविण्यात आल्याने बार्सिलोनाची धाकधूक वाढली. मात्र, त्याचा फारसा परिणाम त्यांच्या खेळावर जाणवला नाही. ६७व्या मिनिटाला सुआरेझने मार्टिन मोंटोया याने उजव्या बाजूने मारलेल्या चेंडूवर गोल केला आणि बार्सिलोनाची आघाडी २-० अशी भक्कम केली. ६९व्या मिनिटाला पीएसजीचा गोल होता होता राहिला. कवानीने पेनल्टी रेषेवरून टोलवलेला चेंडू बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क अ‍ॅण्ड्रे टेर स्टेगनने अचूकपणे अडवला. ७३व्या मिनिटाला मेस्सीचाही गोल हुकला. मात्र ही कसर ७९व्या मिनिटाला सुआरेझने भरून काढली. मध्यरेषेवरून झेव्हियर मासचेरानोकडून आलेल्या पासवर गोल करून बार्सिलोनाचा विजय निश्चित केला. ८१व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या जेरेमी मॅथ्यूइने स्वयंगोल केल्यामुळे पीएसजीची पाटी कोरी राहिली नाही. बार्सिलोनाने ३-१ अशा विजयाची नोंद करत उपांत्य फेरीचे स्थान जवळपास निश्चित केले.

पोर्टोचा ब्रायन म्युनिकला धक्का
योग्य रणनीती आणि त्यानुसार झालेल्या खेळामुळे पोटरे संघाने तगडय़ा ब्रायन म्युनिकचा ३-१ असा पराभव करून २००३-०४ नंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याच्या दृष्टीने कूच केली आहे. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर रिकाडरे क्युरेस्माने गोल करून पोटरेला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १०व्या मिनिटाला क्युरेस्माने गोल केला. २८व्या मिनिटाला थिएगो अलसांतराने म्युनिचसाठी गोल करून पिछाडी १-२ अशी कमी केली. मध्यंतरानंतर पोटरेकडून जॅक्सन मार्टिझने आणखी एक गोल केला आणि पोटरेचा विजय पक्का केला. त्यानंतर पोटरेने बचावात्मक खेळ करून म्युनिचच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

०७ बार्सिलोनाने गेल्या आठ वर्षांत सातव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

०७  पीएसजीचा आपल्या घरच्या मैदानावर सलग २४ सामने अपराजित राहण्याचा विक्रम या पराभवाने संपुष्टात आला.

४००  चॅम्पियन्स लीग स्पध्रेत ४००हून अधिक गोल करणाऱ्या संघाच्या यादीत बार्सिलोनाने धडक मारली आहे. या यादीत रिअल माद्रिद ४३६ गोलसह पहिल्या स्थानावर असून बार्सिलोना दुसऱ्या क्रमांकावर आहेत.