अस्पासच्या निर्णायक गोलमुळे सेल्टा व्हिगोने बरोबरीत रोखले

बार्सिलोना : लुइस सुआरेझच्या दोन गोलमुळे बार्सिलोनाने सेल्टा व्हिगोविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली, पण दोन गुण गमावल्यामुळे त्यांचे जेतेपद आता धोक्यात आले आहे.

ला-लीगा फुटबॉलमध्ये बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यात विजेतेपदासाठी कडवी चुरस रंगली असताना बार्सिलोनाला बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे आता विजेतेपदासाठी रेयाल माद्रिदला प्रबळ दावेदार समजले जात आहे. ३२ सामन्यांमध्ये बार्सिलोनाचे ६९ गुण झाले असून रेयाल माद्रिद ३१ सामन्यांत ६८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सुआरेझने २०व्या आणि ६७व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर ठेवले. पण योडोर स्मोलोव्ह याने ५०व्या मिनिटाला आणि इयागो अस्पास याने ८८व्या मिनिटाला गोल करून सेल्टा व्हिगोला बरोबरी साधून दिली.

लॅझियोच्या विजेतेपदाच्या आशा कायम

लॅझियो संघाने कडवा संघर्ष करत फ्योरेंटिना संघाचे आव्हान २-१ असे मोडीत काढत सेरी-ए स्पर्धेच्या विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.  फ्रँ क रिबरी आणि लुइस अल्बटरे यांनी लॅझियोसाठी प्रत्येकी एक गोल केला, तर सिरो इमोबाइलने फ्योरेंटिनासाठी एकमेव गोल नोंदवला.

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

लंडन : मँचेस्टर युनायटेडने १० जणांसह खेळणाऱ्या  नॉर्विच सिटीचा २-१ असा पाडाव करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ८८व्या मिनिटाला त्यांच्या टिम क्लोस याला पंचांनी लाल कार्ड दाखवल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. सामना १-१ असा रंगतदार स्थितीत असताना अतिरिक्त वेळेत ११८व्या मिनिटाला हॅरी मगायरेने गोल करत युनायटेडला विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारित वेळेत ओडियन इघालोने (५१ मि.) युनायटेडसाठी पहिला गोल केला, तर टॉड कँटवेलने (७५ मि.) नॉर्विचसाठी गोल नोंदवून संघाला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली होती.