बार्सिलोना : भारताच्या सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि अजय जयराम यांनी बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांत आणि जयराम हे भारताचे खेळाडू आमने-सामने येणार आहेत. तत्पूर्वी, सायना हिने जर्मनीच्या वायवॉन ली हिचा २१-१६, २१-१४ असा पराभव केला. सायनाने अवघ्या ३५ मिनिटांत ही लढत जिंकली.

पुरुष एकेरीत श्रीकांत याने भारताच्याच शुभांकर डे याचा २३-२१, २१-१८ असा पराभव केला. एकेरीच्या अन्य लढतीत जयराम याने फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव याचा २१-१४, २१-१२ असा पराभव केला.

सायना आणि श्रीकांतसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे, कारण त्यांच्यासमोर ऑलिम्पिक पात्रतेचे आव्हान आहे. त्यातच गेले वर्ष सायना, श्रीकांतसाठी अपयशी ठरले होते.

अन्य लढतींमध्ये भारताच्या एच. एस. प्रणॉयला सलामीलाच मलेशियाच्या डॅरेन ल्यू याच्याकडून १८-२१, १५-२१ पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की एन. रेड्डी जोडीने मॅथियास ख्रिस्तियनसेन आणि अलेक्झांड्रा बोए या डेन्मार्कच्या जोडीला १०-२१, २१-१६, २१-१७ नमवले. एकेरीत भारताच्या पी. कश्यपलाही दुखापतीमुळे ब्राझीलच्या येगॉर कोएल्होविरुद्धचा सामना अर्धवट सोडावा लागला.