अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसीने बार्सिलोनासोबत झालेला जाहीर वाद मिटवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. बार्सिलोनाच्या चाहत्यांसह संघानेही आता एकत्र येण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मेसीने दिली आहे.

मेसी यंदाच्या हंगामात करारावरून झालेल्या कायदेशीर वादाच्या पाश्र्वभूमीवर बार्सिलोना सोडणार अशी चिन्हे होती. मात्र अखेर मेसीने यंदाच्या हंगामात बार्सिलोनाकडूनच खेळण्याचे ठरवले. ‘‘अनेक वाद झाल्यावर आता मला ते मिटवायचे आहेत. बार्सिलोनाचे चाहते आणि या संघाशी संबंधित प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. बार्सिलोना संघाला यश मिळेल या दृष्टीनेच प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. याआधी मी बार्सिलोनाच्या पदाधिकाऱ्यांवर जाहीर टीका केली असली तरी खेळताना नेहमी संघाच्या भल्याचाच विचार केला,’’ असेही मेसीने स्पष्ट केले.

ऑगस्टमध्ये चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिककडून बार्सिलोनाला २-८ असा मोठा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. त्या लढतीनंतर मेसीच्या खेळावरही टीका झाली होती. मात्र बार्सिलोनाकडूनच या हंगामात खेळण्याचा निर्णय घेतलेल्या मेसीने रविवारी व्हिलारेयालविरुद्धच्या लढतीत गोल करत संघाच्या ४-० विजयात योगदान दिले होते.