बार्सिलोनाची ग्रॅनडावर ४-१ अशी मात

ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या बार्सिलोनाने रविवारी मध्यरात्री ग्रॅनडावर ४-१ अशी मात केली, परंतु हा विजय गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या रिअल माद्रिदची जागा घेण्यासाठी उपयोगी ठरला नाही. बार्सिलोना (६६) दोन गुणांनी पिछाडीवर आहे. प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत नेयमारने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

या लढतीत त्याने एक गोलची नोंद करताच क्लबकडून शंभर गोल करण्याचा विक्रमही केला. बार्सिलोना क्लबसाठी १०० गोल करणारा नेयमार हा ब्राझिलचा तिसरा खेळाडू आहे. याआधी रिव्हाल्डो (१३०) आणि इव्हारिस्टो (१०५) यांनी ही कामगिरी केली आहे. पहिल्या सत्रातील शेवटच्या मिनिटाला लुईस सुआरेझने बार्सिलोनासाठी गोलखाते उघडले. मध्यंतरानंतर ग्रॅनडाकडून त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. जेरेमी बोगाने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. बार्सिलोनाने मेस्सीची अनुपस्थिती जाणवू न देता दमदार प्रदर्शन केले. ६४व्या मिनिटाला पॅको अ‍ॅल्कासरने बार्सिलोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दहा मिनिटांत इव्हान रॅकिटीक (८३ मि.) आणि नेयमार (९० मि.) यांनी गोल करून बार्सिलोनाचा ४-१ असा विजय निश्चित केला.

[jwplayer Lz3JmCgQ]

रिअल माद्रिदचा विजयी धडाका

रिअल माद्रिद क्लबने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत रविवारी कोपा डेल रे स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या डेपोर्टिव्हो अ‍ॅलव्हेस क्लबवर विजय मिळवून जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या बार्सिलोनावर दडपण वाढवले. करिम बेंझेमा, इस्को आणि नॅचो यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर माद्रिदने ३-० असा विजय मिळवला. या विजयासह माद्रिदने २८ सामन्यांनंतर ६८ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे.

घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना माद्रिदने विजयी सपाटा कायम राखला. ३१व्या मिनिटाला कर्णधार डॅनिएल रामोसच्या पासवर करिम बेंझेमाने १५ यार्डावरून चेंडू गोलजाळीत अचूक  तटवला आणि माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसह माद्रिदने एक अनोखा विक्रम नोंदवला. ला लिगा स्पर्धेतील एखाद्या संघाने सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये सलग ५० सामन्यांत गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या सत्रातील या गोलनंतर सामन्यात बचावात्मक खेळावर यजमानांनी भर दिला. अखेरच्या १५ मिनिटांत मात्र वातावरण बरेच तापले. प्रतिस्पर्धी संघाकडून झालेल्या आक्रमणानंतर माद्रिदनेही रणनीती बदलली.

८५व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पासवर इस्कोने गोल केला. त्यापाठोपाठ तीन मिनिटांच्या कालावधीतच नॅचोने गोल करून माद्रिदच्या विजयावर ३-० असे शिक्कामोर्तब केले.

[jwplayer G0Mf57W4]