लुईस सुआरेझ, लिओनेल मेस्सीचा धमाका  बायर्न म्युनिकचीही आगेकूच

गतविजेत्या बार्सिलोनाने युरोपियन फुटबॉल असोसिएशन (युएफा) चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुखापतीतून परतणाऱ्या लिओनेल मेस्सीने लौकिकास साजेसा खेळ केला. त्याला लुईस सुआरेझ़, गेरार्ड पिक्यू आणि अ‍ॅड्रीयानो कोरेइआ यांची साथ मिळाल्याने बार्सिलोनाने ६-१ अशा फरकाने रोमाचा धुव्वा उडविला. बायर्न म्युनिकनेही बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. युरोप खंडातील अव्वल क्लबमध्ये गणना होणाऱ्या म्युनिकने लौकिकाला साजेसा खेळ करताना ऑलिम्पिआकोसवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला.
बॅटे बोरीसोव्ह आणि बायेर लेव्हेर्कुसेन यांच्यातील बेलारुस येथे झालेला सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यामुळे बार्सिलोनाचा ‘इ’ गटातून बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता. त्यामुळे रोमाविरुद्धचा सामना हा औपचारिक ठरला. सामन्याच्या १५व्या मिनिटाला डॅनी अ‍ॅल्व्हेसच्या पासवर सुआरेझने बार्सिलोनासाठी पहिला गोल केला. अवघ्या दोन मिनिटांच्या आत मेस्सीने सुआरेझच्या पासवर संघाची आघाडी दुप्पट केली. ४४व्या मिनिटाला फ्री किकवर सुआरेजने दुसरा गोल नोंदवून संघाला पहिल्या सत्रात ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रातही बार्सिलोनानेच वर्चस्व गाजवले. सुआरेज, मेस्सी आणि नेयमार या त्रिकुटाने रोमा संघाला हैराण केले. चेंडू एकमेकांना सोपविण्याचे त्यांचे अचूक कौशल्य पाहून रोमाची बचावफळी थक्क झाली होती. दुसऱ्या सत्रात पिक्यू (५५ मि.), मेस्सी (५९ मि.) आणि अ‍ॅड्रीयानो (७७ मि.) यांनी गोल करून बार्सिलोनाचा विजय निश्चित केला. रोमाकडून एडीन डीझेकोने भरपाई वेळेत गोल केला.
थॉमस म्युलरचा विक्रम : बायर्न म्युनिकने बुधवारी ऑलिम्पिकासो संघावर ४-० असा विजय मिळवताच थॉमस म्युलरच्या नावावर विक्रम नोंदवला गेला. चॅम्पियन्स लीग स्पध्रेत ५० विजयांचा साक्षीदार होणाऱ्या तरुण खेळाडूंमध्ये म्युलरने आघाडी घेतली. त्याने २६ वष्रे ७२ दिवसांत म्युनिकच्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेत ५० वेळा विजयाची चव चाखली. या विक्रमाबरोबर म्युलरने बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी (२७ वष्रे व १३४ दिवस) आणि रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (२८ वष्रे व २८ दिवस) यांना मागे टाकले. ‘‘या विक्रमाचा अर्थ असा की, गेली पाच वष्रे मी सर्वोत्तम संघासोबत खेळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया म्युलरने दिली.

इतर निकाल
आर्सेनल ३ (मेसूट ओझील २९ मि., अ‍ॅलेक्सिस सांचेझ ३३ व ६९ मि.) विजयी वि. डायनामो झाग्रेब ०.
बायर्न म्युनिक ४ (डोग्लास कोस्टा ८ मि., रॉबेर्ट लेवांडोव्स्की १६ मि., थॉमस म्युलर २० मि., किंग्सले कोमन ६९ मि.) विजयी वि. ऑलिम्पिकासो ०.
मॅकॅबी टेल अ‍ॅव्हीव्ह ० पराभूत वि. चेल्सी ४ (गॅरी कॅहिल २० मि., विलियन ७३ मि., ऑस्कर ७७ मि., कुर्त झोउमा ९०+ मि.)