अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा समावेश असणाऱ्या बार्सिलोना फुटबॉल संघाने ला-लिगा फुटबॉल स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सरावाला सुरुवात केली आहे. स्पेनमधील ला-लिगा फुटबॉल स्पर्धेचा उर्वरित हंगाम जूनपासून सुरू होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

मेसी, लुईस सुआरेझ, गेरार्ड पिकेसारखे बार्सिलोनाचे अव्वल खेळाडू हे त्यांचे सरावाचे साहित्य परिधान करूनच मैदानावर आले. या वेळेस ड्रेसिंग रूममध्ये न जाता त्यांनी थेट मैदानातच प्रवेश केला. या सर्व खेळाडूंनी सामाजिक अंतराचे भान राखत तीन वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर सराव केला. दैनंदिन सरावासह दोन महिने घरात थांबल्यामुळे शरीरावर किती परिणाम झाला आहे याची चाचणीदेखील खेळाडूंनी स्वत:हून सरावात केली. ‘‘पहिल्याप्रमाणे सुरळीत जीवन जगण्याच्या दृष्टीने आता आम्ही सुरुवात केली आहे. ही सकारात्मक परिस्थिती कायम राहील अशीच आशा आम्ही सध्या करत आहोत,’’ असे बार्सिलोनाचा खेळाडू अटरुरो विडालने सांगितले.

बार्सिलोनाप्रमाणेच सेव्हिया, व्हिलारिअल, ओसासुना आणि लेगानेस या ला-लिगामधील संघांनीही सरावाला सुरुवात केली आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगच्या सहा संघांचा विरोध

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) सहा संघांनी यंदाचा हंगाम पूर्ण करण्यासाठी त्रयस्थ स्टेडियमवर सामने खेळण्यास नकार दिला आहे. वॉटफर्ड संघाचे अध्यक्ष स्कॉट डक्सब्युरी यांनी ही माहिती दिली. ‘ईपीएल’मध्ये यंदाच्या हंगामात अजून ९ लढती बाकी असून वॉटफर्ड संघ १७व्या स्थानी आहे. यंदाच्या हंगामातून बाद होणाऱ्या संघांमध्ये वॉटफर्डचा समावेश होण्याची शक्यता आहे. या स्थितीत त्रयस्थ ठिकाणी सामने खेळून धोका स्वीकारण्यास वॉटफर्ड संघ तयार नाही. ‘‘पुन्हा सामने सुरू करण्यासाठी काही संघ तयारही असतील. उदाहरण द्यायचे झाले तर लिव्हरपूलने जवळपास यंदाचा हंगाम जिंकला आहे. काही अन्य संघांनीही ईपीएलचे पुढील हंगामातील स्थान निश्चित केले आहे. मात्र आमच्यासह सहा संघांचा पुन्हा यंदाचा हंगाम खेळवण्यास विरोध आहे,’’ असे डक्सब्युरी म्हणाले.

इंटर, एसी मिलानची सरावाला सुरुवात

मिलान : इंटर मिलान आणि एसी मिलान या इटलीतील अव्वल फुटबॉल संघांनी दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सरावाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी इंटर मिलानच्या संघाशी संबंधित खेळाडू आणि प्रशिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली. मात्र त्यात त्यांना करोना नसल्याचे सिद्ध झाले. कर्णधार सॅमीर हॅँडानोव्हिचसह रोमेलू लुकाकू यांच्यासह खेळाडूंनी सामाजिक अंतराचे भान राखत सरावात सहभाग घेतला. ‘सेरी-ए’ या स्पर्धेतील उर्वरित हंगाम खेळवायचा की नाही याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही.