बार्सिलोना लिवान्टेला नमवत तर रिअल माद्रिदने रिअल बेटिसवर विजय मिळवत स्पॅनिश फुटबॉल प्रीमिअर लीग स्पर्धेत विजयाची नोंद केली. चॅम्पियन्स लीग उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांनी चांगला सराव केला.
बार्सिलोनाने लिवान्टेला १-० असे नमवत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. बार्सिलोनाचा हुकमी खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतग्रस्त झाल्याने बार्सिलोनाला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. सामना संपायला सहा मिनिटे बाकी असताना सेक फॅब्रेगासने शानदार गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हा सामना जिंकणे आवश्यक होते. आम्ही या स्पर्धेच्या सामन्यांना महत्त्व देत नाही असे टीकाकारांचे म्हणणे होते. पण आम्ही प्रत्येक सामन्यासाठी, जिंकण्यासाठी कसून सराव करत होतो. त्यामुळे हा विजय समाधानकारक असल्याचे फॅब्रेगासने सांगितले.
अन्य लढतीत रिअल माद्रिदने रिअल बेटिसवर ३-१ असा विजय मिळवला. पहिल्या सत्रात रिअलने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. मेसुट ओझिलने पहिला गोल करत रिअलचे खाते उघडले. करिम बेनझेमाने ५७व्या मिनिटाला गोल करत रिअलची आघाडी वाढवली. ७३व्या मिनिटाला बेटिसतर्फे जोर्ज मोलिनाने गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिरिक्त वेळेत मेसुट ओझिलने आणखी एक गोल करत रिअल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.