नामांकित फुटबॉल क्लब्जसह जगभरातील चाहत्यांचा विरोध पत्करणाऱ्या सुपर लीगला अद्यापही बार्सिलोना फुटबॉल क्लबचा पाठिंबा कायम आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगसह बिगरनामांकित क्लब्जसाठी घातक ठरू शकणाऱ्या या लीगविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

अधिकाधिक आर्थिक कमाईच्या उद्देशाने युरोपियन फुटबॉलमध्ये बंडखोरी करून सुपर लीगच्या आयोजनाचा प्रयत्न सुरू आहे. यामधून १२ संस्थापक सदस्य संघांपैकी १० जणांनी माघार घेतली आहे. परंतु बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद हे फुटबॉल विश्वातील दोन महत्त्वाचे क्लब अद्यापही या लीगसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच रेयाल माद्रिद फुटबॉल क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी ही लीग कशा प्रकारे लाभदायक आहे, याबाबात स्पष्टीकरण दिले. बार्सिलोनाकडून त्यांना पूर्ण साहाय्य मिळत आहे.

इंग्लंडमधील लिव्हरपूल, आर्सेनल, चेल्सी, टॉटेनहॅम हॉटस्पर, मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी हे सहा क्लब, इटलीतील युव्हेंटस, एसी मिलान आणि इंटर मिलान हे तीन क्लब, तर स्पेनमधील अ‍ॅटलेटिको माद्रिद या क्लबने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १२ संस्थापक सदस्य संघांसह ८ निमंत्रित क्लब्जचा समावेश करून एकूण २० संघांमध्ये सुपर लीग खेळवण्याचा प्रयत्न आहे. परंतु ठरावीक २० संघच दरवर्षी या लीगमध्ये खेळतील. त्यामुळे नामांकित क्लब्जच्या तुलनेत खालच्या स्तरावर असलेल्या क्लब्जला या लीगमध्ये कधीच खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याशिवाय चॅम्पियन्स लीगचे महत्त्वही कमी होईल.

चाहत्यांच्या विरोधामुळे गुंतवणूकदारांना धक्का

लंडन : सुपर लीगमध्ये ३.२५ अब्ज युरोंची गुंतवणूक करणाऱ्या जेपी मॉर्गन समूहाला या स्पर्धेला चाहत्यांकडून होणारा विरोध पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. आर्थिक कमाईवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या या लीगमध्ये सर्वोत्तम संघांचा खेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते. परंतु अनेक क्लब्जनी माघार घेण्याबरोबरच चाहत्यांनी या लीगविरोधात निदर्शने केल्यामुळे जेपी मॉर्गन समूहाने माफी मागितली असून भविष्यात गुंतवणूक करताना या गोष्टींची खबरदारी बाळगू, असे आश्वासन दिले आहे.

विश्वातील बलाढ्य क्लब्जकडूनच खेळाला अधिकाधिक नफा होतो. सध्याची परिस्थिती आणि भविष्याचा विचार करता फुटबॉलला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी या लीगची गरज आहे. त्यामुळे आम्ही सुपर लीगला पाठिंबा न देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

– जोन लार्पोटा, बार्सिलोना फुटबॉल क्लबचे अध्यक्ष