बार्सिलोनाचे उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने पाऊल; एस्पालियोलवर विजय
कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा
लिओनेल मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना क्लबने ०-१ अशी पिछाडी भरून काढताना एस्पानियोल क्लबचा ४-१ असा पराभव केला. कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेतील या सामन्यात विजयामुळे गतविजेत्या बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मेस्सीला गेरार्ड पिक्यू आणि नेयमार यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली. एस्पानियोलकडून फेलिप सैसेडोने एकमेव गोल केला. उभय क्लबमध्ये १३ जानेवारीला परतीचा सामना होणार आहे.
गतआठवडय़ात एस्पानियोल क्लबने बार्सिलोनाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यामुळे या लढतीत चुरशीचा सामना पाहायला मिळेल हे निश्चितच होते. ९व्या मिनिटाला एस्पानियोलच्या सैसेडोने गोल करून त्याची प्रचिती घडवली. मात्र, अवघ्या चार मिनिटांत मेस्सीने प्रतिस्पर्धी संघाच्या पेनल्टी क्षेत्रातील बचावफळी भेदून गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. पुढच्याच मिनिटाला बार्सिलोनाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नवर नेयमारला गोल करण्यापासून गोलरक्षक पाव लोपेझने रोखले. या गोलनंतर दोन्ही क्लबमधील तणाव वाढला. दोघांनी आक्रमक खेळ करताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांना पहिल्या सत्रात तिनवेळा पिवळ्या कार्डचा वापर करावा लागला. ४४व्या मिनिटाला मेस्सीने ३५ यार्डावरून चेंडू अचुकपणे गोलजाळीत सुपूर्द केला आणि बार्सिलोनाला पहिल्या सत्रात २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्राच्या चौथ्याच मिनिटाला गेरार्डने बार्सिलोनाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. ६२व्या मिनिटाला पॉलने मेस्सीचा प्रयत्न हाणून पाडत एस्पानियोलला दिलासा दिला. ७२व्या मिनिटाला त्यांना जबर धक्का बसला. हेमान गोंझालेजला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड दाखविण्यात आल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
अवघ्या तीन मिनिटांत पॅप डिओपला लाल कार्ड दाखविण्यात आल्याने एस्पानियोलला उर्वरित सामन्यांत ९ खेळाडूंनी खेळावे लागले. ८८व्या मिनिटाला नेयमारने गोल करून बार्सिलोनाचा ४-१ असा दणदणीत विजय निश्चित केला.