स्पॅनिश फुटबॉल विश्वात सगळ्यात प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या कोपा डेल रे फुटबॉल चषकावर बार्सिलोनाने नाव कोरले. बार्सिलोनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला लिओनेल मेस्सी. मेस्सीच्या दोन गोलांच्या बळावर बार्सलिोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. बार्सिलोनाचे या स्पर्धेचे हे २७वे जेतेपद आहे.
नवव्या मिनिटाला नेयमारने गोल केला, मात्र पंचांनी तो ऑफसाइड ठरवला. थोडय़ाच वेळात मेस्सीने २०व्या मिनिटाला अ‍ॅथलेटिकोच्या चार बचावपटूंना भेदत अफलातून गोल केला. मोठय़ा सामन्यांमध्ये निर्णायक गोल करण्याचे कसब मेस्सीने पुन्हा एकदा दाखवून दिले. ३६व्या मिनिटाला नेयमारने गोल
करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर अ‍ॅथलेटिकोने बचाव भक्कम करत बार्सिलोनाच्या आक्रमणाला थोपवले. मात्र सातत्याने गोल करण्यासाठी माहीर असलेल्या मेस्सीने ७४व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. पाचच मिनिटांत इन्की विल्यम्सने गोल करत अ‍ॅथलेटिकोचे खाते उघडले. मात्र या गोलनंतर बार्सिलोनाने चेंडूवर नियंत्रण राखत अ‍ॅथलेटिकोला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.
स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिकोला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असतानाही बार्सिलोनाने व्यावसायिक खेळ
करत विजय साकारला. झेव्ही हर्नाडिझचा बार्सिलोनातर्फे हा शेवटचा सामना होता.