News Flash

बार्सिलोनाचे ‘पंचक’

बार्सिलोना क्लबसाठी २०१५ हे वर्ष जणू स्वप्नवतच....

| December 21, 2015 01:14 am

*क्लब विश्वचषकासह वर्षांतील पाचव्या जेतेपदावर दावा

*सुआरेझ, मेस्सीचा गोलधडाका, रिव्हर प्लेटवर ३-० असा विजय

बार्सिलोना क्लबसाठी २०१५ हे वर्ष जणू स्वप्नवतच.. ला लिगा, कोपा डेल रे, युएफा चॅम्पियन्स लीग आणि युएफा सुपर चषक स्पध्रेच्या जेतेपदांसह बार्सिलोनाने फिफा क्लब विश्वचषकाचे जेतेपद पटकावत या वर्षांत ‘पंच’तारांकित कामगिरीची नोंद केली. रविवारी जपानमधील दुसऱ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या योकोहामा शहरातील निस्सान स्टेडियमवर ६६,८५३ प्रेक्षकांच्या साक्षीने बार्सिलोनाने ३-० अशा फरकाने रिव्हर प्लेट क्लबवर विजय मिळवला. लुईस सुआरेझने दोन गोल केले, तर लिओनेल मेस्सीने एक गोलची भर घालून क्लबला तिसऱ्यांदा फिफा क्लब विश्वचषक पटकावण्यात मदत केली. सुआरेझला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

पोटाच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा होऊन मैदानात परतलेल्या मेस्सीने ३६व्या मिनिटाला क्लबचे खाते उघडले. नेयमारने डोक्याने टोलावलेला चेंडू मेस्सीने अचूक हेरून डाव्या पायाने तो गोलजाळीत तटवला. मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाने १-० अशी आघाडी कायम राखली होती. उपांत्य फेरीत गुआंझाऊ एव्हरग्रँडविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या सुआरेझने दुसरे सत्र गाजवले. मध्यंतरानंतर अवघ्या ४ मिनिटांत सुआरेझने सर्गिओच्या पासवर गोल करून बार्सिलोनाची आघाडी २-० अशी मजबूत केली. ५३व्या मिनिटाला मेस्सीला सामन्यातील दुसरा गोल नोंदवण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आले. ६८व्या मिनिटाला पुन्हा एकदा सुआरेझने गोल करत बार्सिलोनाला ३-० अशा आघाडीवर नेले. त्यानंतर रिव्हर प्लेटकडून खेळाडूंनी अदलाबदली झाली आणि सामन्यातील आक्रमकतेची धार अधिक तीव्र वाटू लागली. मात्र, ३-० अशा आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाच्या बचावासमोर ती धार बोथट वाटत होती. बार्सिलोनाने पुढील २० मिनिटे बचावात्मक खेळ करताना आघाडी कायम राखून विजय निश्चित केला.

हा चषक घरी घेऊन जात आहोत, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. याच उद्देशाने आम्ही मैदानात उतरलो होतो. सातत्यपूर्ण खेळ आणि अधिकाधिक चषक जिंकणे, हे आमचे पुढील ध्येय आहे.

लुईस सुआरेझ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 1:14 am

Web Title: barcelona win club world cup fifth major title of 2015
टॅग : Barcelona
Next Stories
1 फिफातील भ्रष्टाचार.. अन् बार्सिलोनाचा बोलबाला
2 भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम
3 प्रो कबड्डी लीगचे वर्षांतून दोन हंगाम नकोत!
Just Now!
X