चॅम्पियन्स लीग फुटबॉल

मँचेस्टर युनायटेडविरुद्ध आज उपांत्यपूर्व फेरीतील परतीचा सामना

सध्या बहरात नसलेल्या लिओनेल मेसी आणि त्याच्या बार्सिलोना संघासमोर तब्बल चार वर्षांनंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचे उद्दिष्ट असेल. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा १-० असा पाडाव केल्यामुळे आता घरच्या मैदानावर मंगळवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) होणाऱ्या परतीच्या सामन्यात बार्सिलोनाला उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी आहे.

२०१५ मध्ये विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या बार्सिलोनाला गेल्या तीन मोसमांत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. बार्सिलोनाची मदार मेसीवर असली तरी दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मेसीला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगचे चार वेळा विजेतेपद पटकावून देणाऱ्या मेसीला आता पाचवे विजेतेपद खुणावत आहे. ‘‘गेल्या मोसमात आम्ही जबरदस्त कामगिरी केली होती, पण अखेरच्या क्षणी पदरी अपयश आले होते. या वर्षी आम्ही पुन्हा एकदा कॅम्प न्यू येथे चॅम्पियन्स करंडक परत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे मेसीने सांगितले.

रोनाल्डोच्या युव्हेंटसची लढत आयएक्सशी

मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसची लढत आयएक्सशी होणार आहे. रोनाल्डोने हेडरवर केलेल्या अप्रतिम गोलमुळे उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात युव्हेंटसने आयएक्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली होती. रोनाल्डोचा हा चॅम्पियन्स लीगमधील १२५वा गोल ठरला होता. आयएक्सकडून डेव्हिड नेरेस याने बरोबरी साधणारा गोल लगावला होता. आता परतीच्या सामन्यात युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या अजाक्सचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. युव्हेंटसने फक्त दोनच वेळा चॅम्पियन्स लीग चषकावर कब्जा केला असून, १९९६च्या अंतिम फेरीत त्यांनी अजाक्सला हरवले होते. चार वेळा चॅम्पियन्स करंडक पटकावणाऱ्या आयएक्सने १९७३ मध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली होती. त्यांनी अखेरचे जेतेपद १९९५ मध्ये पटकावले होते.