बार्सिलोना आणि रिअल माद्रिद म्हटले की लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीआनो रोनाल्डो यांच्यात रंगणारी चुरस डोळ्यासमोर उभी राहते. त्यात दुखापतीतून सावरुन दोन महिन्यांनंतर मैदानावर परतणाऱ्या मेस्सीचा पहिलाच मुकाबला रोनाल्डोसोबत होणार असेल, तर सोने पे सुहागा. शनिवारी मध्यरात्री ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकले, परंतु यात लुईस सुआरेझ, नेयमार आणि अ‍ॅण्ड्रेस इनिएस्टा यांनी बाजी मारली. सुआरेझचे दोन गोल आणि नेयमार व इनिएस्टाच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बार्सिलोनाने माद्रिदवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले.

सुआरेझने १०व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला चांगली सुरुवात करून दिली. सेर्गी रोबेटरेच्या पासवर सुआरेजने केलेल्या गोलने बार्सिलोनाने १-० अशी आघाडी घेतली. ३९व्या मिनिटाला नेयमारने त्यात भर घातली आणि मध्यंतरापर्यंत बार्सिलोना २-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या सत्रातही बार्सिलोनाचा हाच करिष्मा सुरू राहिला. ५३व्या मिनिटाला इनिएस्टाने गोल करून बार्सिलोनाला ३-० असे आघाडीवर आणले. ५७व्या मिनिटाला इव्हान रॅकिटीकला माघारी बोलवून बार्सिलोनाने मेस्सीला मैदानावर बोलवण्याचा निर्णय घेतला. मेस्सीला ३५ मिनिटांच्या खेळात मात्र गोल करता आला नाही. तरीही त्याची उपस्थिती संघात नवचैतन्य आणणारी होती. ७४व्या मिनिटाला सुआरेजने पुन्हा एक गोल करत बार्सिलोनाचा विजय निश्चित केला. बार्सिलोनाने अखेपर्यंत ४-० अशी आघाडी कायम राखून माद्रिदचा लाजीरवाणा पराभव केला. ‘‘सुरुवातीपासून आम्ही वर्चस्व राखले आणि सातत्यपूर्ण खेळ करून विजय साजरा केला. याचे श्रेय सर्व खेळाडूंना जाते,’’ अशी प्रतिक्रीया बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी दिली.