बडोदा : युसूफ पठाणच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर बडोद्याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर २५ धावांनी मात केली. या स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा पहिलाच पराभव ठरला.

बडोद्याच्या मोतीबाग क्रिकेट स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आदित्य वाघमोडे (३८) आणि स्वप्निल सिंग (४६) यांचा अपवाद वगळता बडोद्याचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील युसूफ पठाणने डावाला उभारी दिली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८३ धावांची तडाखेबंद खेळी युसूफने साकारली. ६ चौकार आणि ५ षटकारांसह त्याने साकारलेल्या अर्धशतकामुळे बडोद्याने ५० षटकांत ९ बाद २४९ धावा उभारल्या.

बडोद्याच्या २५० धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक झाली. राहुल त्रिपाठी (१०) आणि रुतुराज गायकवाड (२२) लवकर बाद झाल्यानंतर अंकित बावणे (३९) आणि केदार जाधव (३३) यांनी ४७ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राचा डाव सावरला; पण त्यानंतर युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर महाराष्ट्राची पडझड झाली. तळाच्या सत्यजीत बच्छाव (३२) याने कडवी लढत दिली, पण महाराष्ट्राला ५० षटकांत ९ बाद २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. ८३ धावा आणि ३ बळी मिळवणारा युसूफ बडोद्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : ५० षटकांत ९ बाद २४९ (युसूफ पठाण ८३, स्वप्निल सिंग ४६, समद फल्लाह ५/४१) विजयी वि. महाराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद २२४ (अंकित बावणे ३९, केदार जाधव ३३, युसूफ पठाण ३/३३).