संघातील एका खेळाडूच्या भावाला करोनाची लागण झाल्यानंतर, बडोदा क्रिकेट असोसिएशनने आपल्या खेळाडूंसाठी आयोजित केलेला फिटनेस कँप रद्द केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं असल्याचं बडोदा क्रिकेट संघटनेचे सचिव अजित लेले यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

बडोदा क्रिकेट असोसिएशनने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या खेळाडूंसाठी या कँपचं आयोजन केलं होतं. रणजी क्रिकेट स्पर्धेत बडोद्याचं प्रतिनिधीत्व करणारे कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या हे खेळाडू या कँपमध्ये सहभागी होणार नव्हते. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या घराजवळील मैदानावर सराव करण्याला पसंती दर्शवली. त्यामुळे उर्वरित खेळाडूंसाठी मोती बाग मैदानावर हा कँप आयोजित करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून संघटनेने कंटेनमेंट झोनमध्ये राहत नसलेल्या खेळाडूंनाच पहिले परवानगी दिली होती.

कँपला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूचं थर्मल स्क्रिनींग, त्यांच्या तब्येतीविषयी रोज माहिती घेणं असे सर्व खबरदारीचे उपाय बडोदा क्रिकेट संघटनेने घेतले होते. मात्र संघातील एका खेळाडूच्या भावाला करोनाची लागण झाल्यानंतर कँप सुरु ठेवणं धोकादायक असल्याचं मत लेले यांनी बोलून दाखवलं. त्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडूंनाही आम्ही स्वतःची चाचणी करवून घेत क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिलेला असल्याचं लेले यांनी स्पष्ट केलं.