भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांच्यावर स्वत:च्याच संघटनेकडून म्हणजे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या (बीसीए) सचिव पदावरून हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढवली आहे. बीसीएच्या कार्यकारिणी समितीवर पुन्हा समावेश करण्यासाठी पटेल यांनी दाखल केलेली याचिका बडोद्यातील शहर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पटेल यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक बीसीएने सायंकाळी काढले. दरम्यान, संयुक्त सचिव अंशुमन गायकवाड यांच्या गटाने हे कुरघोडीचे राजकारण केले आहे, असा आरोप पटेल यांनी केला आहे.
या निर्णयामुळे सदर संघटनेच्या नियमानुसार पटेल बीसीसीआयच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत बडोद्याचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. बीसीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘‘बडोदा क्रिकेट असोसिएशनची घटना आणि कार्यकारिणी समिती सदस्यत्वाच्या पात्रतेसाठीचे नियम आणि अटी यांच्या आधारे संजय पटेल यांची कार्यकारिणी समितीने (बीसीएचे सचिव आणि कार्यकारिणी समिती सदस्य) हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
बुधवारी बडोद्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी संजयभाई ठक्कर यांनी बीसीएच्या अर्जावर शिक्कामोर्तब करताना पटेल यांची मागणी फेटाळून लावली.