रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा   

दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राच्या ८ बाद २५३ धावा; स्वप्निलची अष्टपैलू चमक

पहिल्या डावात बहुमूल्य अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या स्वप्निल सिंगने गोलंदाजीतही कमाल केल्यामुळे बडोद्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद २५३ धावांवर रोखले. बडोदा संघाने पहिल्या डावात ३२२ धावा उभारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र संघ अद्याप ६९ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे दोनच फलंदाज शिल्लक असल्याने बडोद्याची आघाडी घेण्याची संधी बळावली आहे.

सोमवारच्या ९ बाद ३२२ धावांवरून पुढे खेळताना दिवसाच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर लुकमन मेरिवाला (१४) बाद झाला आणि एका धावेचीही भर न घालता बडोद्याचा डाव ३२२ धावांवर संपुष्टात आला. बडोद्यातर्फे युसूफ पठाणने सर्वाधिक ९९ धावा केल्या तर महाराष्ट्रातर्फे सत्यजित बच्चावने चार बळी मिळवले.

प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व चिराग खुराना यांनी ५६ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. ऋतुराज २३ धावांवर बाद झाल्यावर चिरागने नौशाद शेखच्या साथीने दुसऱ्या गडय़ासाठी आणखी ६० धावांची भर घातली. महाराष्ट्र १ बाद ११६ अशा सुस्थितीत असताना स्वप्निलने चेंडू हाती घेतला आणि त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या बळावर महाराष्ट्राची अवस्था बिकट केली. ७३ धावा देत त्याने नौशाद (६५), राहुल त्रिपाठी (१०), रोहित मोठवानी (६) व आशय पालकर (६) यांना बाद केले. तर भार्गव भट्टने चिरागला ५६ धावांवर बाद करत महाराष्ट्राला ८ बाद २३० धावा अशा अडचणीत आणले. दिवसाच्या अखेरीस अनुपम संकलेचा व सत्यजित यांनी अनुक्रमे ३० व १६ धावांवर नाबाद राहात आजच्या दिवसातील शेवटची षटके खेळून काढल्याने महाराष्ट्राचा डाव लांबला.

बडोदा (पहिला डाव) : ८३.४ षटकांत सर्व बाद ३२२

महाराष्ट्र (पहिला डाव) : ८४ षटकांत ८ बाद २५३ (नौशाद शेख ६५, चिराग खुराना ५६, अनुपम संकलेचा (खेळत आहे) ३०, सत्यजित बच्चाव (खेळत आहे) १६; स्वप्निल सिंग ४/७३).