बॅसेल खुली टेनिस स्पर्धा एएफपी, बॅसेल

स्वित्र्झलडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्विस बॅसेल खुल्या टेनिस स्पर्धेचे १०व्यांदा विजेतेपद मिळवले, तर एकूण कारकीर्दीतील त्याचे १०३वे विजेतेपद ठरले.

३८ वर्षीय अग्रमानांकित फेडररने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनॉरला ६-२, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत फेडररने एकही सेट गमावला नाही. २००६मध्ये वयाच्या २५व्या वर्षी फेडररने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तर गेल्या पाच वर्षांत (२०१४ पासून) चौथ्यांदा त्याने जेतेपदाचा चषक उंचावला. पुरुषांमध्ये सर्वाधिक विजेतेपदे मिळवणाऱ्यांच्या यादीत फेडरर दुसऱ्या स्थानी असून जिमी कॉनर्स १०९ विजेतेपदांसह अग्रस्थानी आहे.

तंदुरुस्ती राखण्यासाठी पॅरिस मास्टर्समधून माघार

बॅसेल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून फेडररने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली असली तरी मंगळवारपासून सुरू झालेल्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून या खेळाडूने माघार घेतली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फेडररने पुढील वर्षांतील महत्त्वाच्या स्पर्धासाठी स्वत:ला अधिकाधिक तंदुरुस्त राखण्यावर भर दिला आहे. त्याशिवाय यापूर्वीच ऑस्ट्रेलियन आणि ऑलिम्पिकसारख्या महत्त्वांच्या स्पर्धामध्ये आपण खेळणार असल्याचे फेडररने सांगितल्याने तो सावधपणेच स्पर्धाची निवड करतो आहे.