‘एनबीए’ लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला बास्केटबॉलपटू हा बहुमान मिळवणाऱ्या सतनाम सिंग भामरावर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात बेंगळूरु येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान २३ वर्षीय सतनामची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे १९ नोव्हेंबरपासूनच त्याच्या निलंबनाचा काळ सुरू झाला आहे. सतनामच्या मूत्र चाचणीच्या नमुन्यात प्रतिबंधात्मक घटकांचे अंश आढळले आहेत. परंतु सतनामने त्याच्यावरील निलंबनाचे खंडन केले आहे.

‘नाडा’ने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदन पत्रात सतनामच्या चाचणीविषयी सखोल माहिती दिली. ‘‘११ नोव्हेंबर रोजी झालेल्या मूत्र चाचणीच्या नमुन्यात सतनाम दोषी आढळला असून १९ नोव्हेंबरपासून त्याच्या निलंबनाचा काळ सुरू झाला आहे. त्याशिवाय पुढील तीन महिन्यांत उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीनेही त्याला दोषी ठरवल्यास त्याच्यावरील बंदीचा काळ किमान चार वर्षे लांबू शकतो,’’ असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र सतनामने पुन्हा एकदा चाचणी घेण्याऐवजी यासंबंधी उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीकडे दाद मागितली आहे आणि त्याच्यावर लादण्यात आलेले तात्काळ निलंबनही स्वीकारले आहे.

२०१५च्या ‘एनबीए’ लीगमध्ये सतनाम सहभागी झाला होता. एनबीएमध्ये खेळणारा तो आजवरचा एकमेव भारतीय खेळाडू असून भारतीय बास्केटबॉलचा चेहरा म्हणून त्याला ओळखले जाते. त्याशिवाय १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही त्याने वैयक्तिक कारण पुढे करत माघार घेतली होती. सतनामने आशियाई अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून २०१९च्या विश्वचषक बास्केटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतही तो खेळला होता. दरम्यान, सदर प्रसंगाविषयी भारतीय बास्केटबॉल महासंघाने त्यांना काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

सतनामवर लादण्यात आलेल्या निलंबनाविषयी आम्हाला काहीही कल्पना नसून १५ डिसेंबरनंतरच आम्ही याविषयी आमचे मत कळवू. त्याशिवाय ‘नाडा’ने आम्हाला कल्पना न देता सतनामलाच थेट बंदीचे पत्र पोहचवल्यामुळे आमची एक प्रकारे फसवणूक केली आहे.

– चंदेर मुखी शर्मा, भारतीय बास्केटबॉल महासंघाचे सचिव