भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) यांचे अध्यक्षपद मिळवताना कोणतेही नियम मोडलेले नाहीत, असे सांगत नरिंदर बात्रा यांनी त्यांच्यावरील निवडणुकीत अनियमितता केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांना बात्रांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘आयओए’चे अध्यक्ष म्हणून बात्रा यांची वर्णी लागली त्या वेळेस नियमांनुसार ते पात्र नव्हते, असा आरोप ‘आयओए’चे उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी केला आहे. यासंबंधी मित्तल यांनी ‘एफआयएच’ला पत्र पाठवले आहे. मात्र बात्रा यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर देताना बाख यांना म्हटले आहे की, ‘‘आयओए किंवा एफआयएच यांच्या निवडणुकांमध्ये अध्यक्षपद स्वीकारताना मी कोणतीही अनियमितता केली नाही. माझ्यासोबतच २०१७मध्ये निवडून आलेले मित्तल याप्रकारे आरोप करत आहेत ही निराशाजनक बाब आहे. आयओएच्या २०२१मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदासाठी मित्तल हे उत्सुक आहेत म्हणून ते माझ्यावर या प्रकारचे आरोप करत आहेत.’’

मित्तल यांनी याआधी ‘आयओसी’लादेखील पत्र लिहून बात्रा यांची ‘आयओए’ अध्यक्षपदावरील निवड बेकायदेशीर होती, असा आरोप केला होता.