क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये भांडण झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा घरगुती क्रिकेट, शक्यतो ही भांडणे शाब्दिक असतात. मात्र, मध्य प्रदेशमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. अर्धशतक पूर्ण करता आले नाही म्हणून फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला मारहाण केली. या मारहाणीत क्षेत्ररक्षक गंभीर जखमी झाला आहे.

मध्य प्रदेशमध्ये एका स्थानिक क्रिकेट सामन्यात हा प्रकार घडला. नगर पोलीस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी ही माहिती दिली. शनिवारी गोला मंदिर पोलीस स्टेशन परिसरातील मैदानावर फलंदाज संजय पलिया नावाचा फलंदाज खेळत होता. 49 धावांवर असताना त्याचा क्षेत्ररक्षक सचिन पाराशरने झेल घेतला. संतापलेल्या संजयने सचिनला बॅटने मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती, की रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सचिन बेशुद्ध होता.

या घटनेनंतर संजय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सजंयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मियांदाद आणि डेनिस लिलीचे भांडण

Dennis Lillee and Javed Miandad fight

1981मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद आणि डेनिस लिली एकमेकांशी भिडले होते. वाकाच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान मियांदाद आणि लिली यांच्यात खटका उडाला होता. लिलीच्या एका चेंडूवर एलबीडब्ल्यू अपील केले असताना पंचानी मियांदादला नाबाद दिले. पुढच्या चेंडूवर मियांदाद एक धाव काढत नॉन स्ट्राईकवर गेला. त्यावेळी धाव घेताना लिली मियांदादच्या मध्ये येत होता. लिलीने मियांदादच्या पॅडवर लाथ मारली. प्रत्युत्तरात मियांदानेही बॅट उगारली. पंचांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.