पर्थ स्कॉर्चर्सचा सलामीचा फलंदाज मायकेल क्लिंगर एका सामन्यात वादग्रस्तरीत्या बाद झाला असून हा चर्चेचा विषय झाला आहे. त्याच्या संघानं रविवारी झालेल्या बिग बॅश लीगच्या सामन्यात सिडनी सिक्सर्सचा पराभव केला परंतु पर्थ स्कॉर्चर्ससाठी हा सामना लक्षात राहिला क्लिंगरच्या विकेटमुळे.

पर्थ स्कॉर्चर्स 178 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये अंपायर बॉल किती झाले हे मोजायला विसरले आणि हे षटक चक्क सात चेंडूंचं टाकण्यात आलं. बेन ड्वार्शुअसनं हे षटक टाकलं आणि सातव्या चेंडूवर त्यानं क्लिंगरला बाद केलं. स्कॉर्चर्सनी हा सामना जिंकला आहे. फलंदाजाचं नशीब इतकं खराब की, पर्थच्या सलामीच्या या फलंदाजानं क्लिंगरनं फटकावलेल्या चेंडूवर थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं झेल घेतला व क्लिंगरला बाद केलं. अंपायर व सामनाधिकारी दोघांनाही कळलं नाही की षटक आधीच संपलेलं आहे. नंतर कळलं की गोलंदाजानं सातवा चेंडू टाकला आहे आणि त्यावर पाच चेंडूंमध्ये दोन धावा करणाऱ्या क्लिंगरची विकेट घेतली आहे.

अर्थात, पर्थ संघासाठी ही विकेट फारशी फटका देणारी ठरली नाही कारण नंतर आलेल्या कॅमेरॉन बँकरॉफ्टनं नाबाद 87 धावा केल्या व 18.5 षटकांमध्ये पर्थनं सिडनीवर विजय मिळवला. चेंडू कुरतडल्याप्रकरणी झालेल्या निलंबनानंतर बँकरॉफ्ट परत आला असून त्यानं 61 चेंडूंमध्ये आठ चौकार व एक षटकार मारत 87 धावांची खेळी केली. याआधीही मेलबर्नविरोधात खेळताना त्यानं 42 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळी केली होती.
पर्थचा कर्णधार अॅश्टन टर्नरनंही 30 चेंडूंमध्ये 60 धावा करत सामना जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. दोघांनी 98 धावांची भागीदारी केली व सात गडी राखून पर्थनं सामना जिंकला.