विश्वविजेता विश्वनाथन आनंद आपल्या कारकीर्दीमधील सर्वात खडतर काळाला सामोरा जात आहे. तीन पराभव, दोन बरोबरी आणि रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर मोरोझेव्हिचसोबत फक्त एकमेव विजय ही त्याची ताल स्मृतिचषक बुद्धिबळ स्पध्रेतील आतापर्यंतची कामगिरी. ही ‘चौसष्ट चौकटींचा राजा’ असे बिरूद मिळविणाऱ्या आनंदसाठी मुळीच साजेशी नाही. त्यामुळे बुद्धिबळ विश्वामधील या महत्त्वाच्या स्पध्रेत आनंद तळाच्या स्थानावर फेकला गेला आहे.
आता सातव्या फेरीत त्याच्यापुढे आव्हान उभे आहे ते अझरबैजानच्या शाखरियार मामेडय़ारोव्हशी. परंतु पुनरागमन करण्यासाठी आनंदला उर्वरित फेऱ्यांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आता फक्त तीन फेऱ्या शिल्लक असल्यामुळे हे आव्हान मुळीच सोपे नाही. या तीन लढतींपैकी दोन लढतींमध्ये आनंदला काळ्या मोहऱ्यांनिशी खेळावे लागणार आहे. त्यामुळे आनंदपुढील समस्यांमध्ये भरच पडणार आहे.
या स्पध्रेत ‘ताल’ हरवल्याप्रमाणे खेळणाऱ्या आनंदला पहिल्याच दिवशी धक्का बसला होता. इटलीच्या फॅबियानो कारूआनाने त्याचा पराभव करण्याची किमया साधली होती. त्यानंतर पाचव्या फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून तर सहाव्या फेरीत आघाडीवीर हिकारू नाकामुरा (अमेरिका)कडून आनंदने पराभव पत्करला. कार्लसनसोबतच्या आनंदला या वर्षी जगज्जेतेपदाची लढत द्यायची आहे. त्यामुळे आनंदच्या चिंतेत भरच पडला आहे.