2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही महिने शिल्लक असताना, भारतीय वन-डे संघाची मधल्या फळीतल्या फलंदाजीची चिंता अजुन संपली नाहीये. विशेषकरुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची आणि मधल्या फळीत फलंदाजीचा भार कोणी सावरायचा यावर भारतीय संघ अनेक प्रयोग करतो आहे. सध्या अंबाती रायुडूला भारतीय वन-डे संघात जागा मिळाली आहे. मात्र आपल्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी दडपण येत नसल्याचं रायुडूने स्पष्ट केलं आहे. तो दुसऱ्या वन-डे सामन्याआधी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“मी सध्या मालिकेवर माझं लक्ष केंद्रीत केलं आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला मधल्या फळीत फलंदाजी करण्याचं फारसं दडपण येत नाही. मी गेली अनेक वर्ष मधल्या फळीत फलंदाजी करतोय, त्यामुळी ही गोष्ट मी पहिल्यांदा करतोय अशातला काही भाग नाही.” रायुडूने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. इंग्लंड दौऱ्यात वन-डे मालिकेत यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे रायुडूला संघातून माघार घ्यावी लागली होती.

अवश्य वाचा –  तू माणूस आहेस की कोण, तमिम इक्बालकडून विराट कोहलीची स्तुती

सध्या मी आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो आहे. सध्या सलामीचे फलंदाज भारतासाठी चांगली कामगिरी करतायत, त्यामुळे ज्यावेळी फलंदाजीची संधी येते त्यावेळी डोकं शांत ठेवून प्रसंगानुरुप फलंदाजी करण्याचं मोठं आव्हान मधल्या फळीतल्या फलंदाजांवर असतं. सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे उरलेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा –  IND vs WI : धोनीकडून खेळपट्टीचं निरीक्षण; उद्या करणार का ‘हा’ पराक्रम?