तीन सलग पराभवांना सामोरे गेलेल्या दिल्ली डेअरडेव्हिलसला पहिल्या विजयाची आस लागली आहे. आता त्यांच्यासमोर आव्हान आहे नवीन परंतु दणक्यात सलामी देणाऱ्या हैदराबाद सनरायझर्सचे. दिल्लीसाठी सगळ्यात जमेची बाजू म्हणजे धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचे पुनरागमन.
भारतीय संघातून डच्चू देण्यात आलेला सेहवाग डेअरडेव्हिल्सला विजयपथावर नेऊ शकतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. केव्हिन पीटरसन आणि जेसी रायडर हे दोन प्रमुख फलंदाज नसल्याने माहेला जयवर्धने आणि डेव्हिड वॉर्नरवर दिल्लीच्या फलंदाजांची भिस्त आहे. वॉर्नरने फॉर्म गवसल्याने दिल्लीची चिंता कमी झाल्या आहेत. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.
दुसरीकडे हैदराबाद सनरायझर्सची फलंदाजी कुमार संगकारा आणि कॅमेरुन व्हाइट यांच्यावर अवलंबून आहे. थिसारा परेराकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे.
सनरायर्झसची मदार आहे ती गोलंदाजीवर. डेल स्टेन, इशांत शर्मा, अमित मिश्रा हे त्रिकुट जबरदस्त फॉर्मात आहे. दिल्लीच्या फलंदाजांसाठी हे त्रिकुट डोकेदुखी ठरू शकते. हनुमा विहारी हा युवा अष्टपैलू खेळाडू सनरायझर्ससाठी उपयुक्त खेळाडू ठरू शकतो.
मॉर्ने मॉर्केल संघात परतल्याने दिल्लीची गोलंदाजी मजबूत झाली आहे. उमेश यादव आणि शाहबाझ नदीम सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. इरफान पठाणकडून अष्टपैलू खेळाची दिल्लीला अपेक्षा आहे. आंद्रे रसेल, जोहान बोथा, जीवन मेंडिस हे तिन्ही परदेशी खेळाडू प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याने दिल्लीला अन्य पर्यायाचा विचार करावा लागू शकतो.   
दोन सलग विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला नमवले होते. या पराभवातून शिकत पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी सनरायझर्स उत्सुक आहेत तर दिल्ली डेअरडेव्हिल्सला हंगामातील पहिल्यावहिल्या विजयाची नितांत आवश्यकता आहे.