बुंडेसलिगा फुटबॉल

बर्लिन : बायर्न म्युनिकने शनिवारी रात्री दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या आयनट्राच फ्रँकफर्टचे आव्हान ५-२ असे मोडून काढत बुंडेसलीगा फुटबॉलमध्ये चार गुणांच्या फरकासह आपले अग्रस्थान कायम राखले.

लेऑन गोरेट्झका, थॉमस म्युलर, रॉबर्ट लेव्हानडोवस्की आणि अफोन्सो डेव्हिस यांचे गोल तर मार्टिन हिन्टरेगर याचा स्वयंगोल बायर्न म्युनिकच्या विजयात मोलाचे ठरले. दुसऱ्या सत्रात फ्रँकफर्टच्या मार्टिन हिन्टेरिगरने दोन गोल करत बायर्न म्युनिकला कडवी टक्कर दिली होती. या मोसमात फ्रँकफर्ट हा संघ बायर्नसाठी डोकेदुखी ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सामन्यात फ्रँकफर्टने बायर्नला ५-१ असे हरवले होते.

बायर्न म्युनिकने ६१ गुणांसह आघाडी घेतली असली तरी दुसऱ्या क्रमांकावरील बोरुसिया डॉर्टमंडने विजेतेपदाच्या शर्यतीत त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. शनिवारच्या सामन्यावर बायर्नने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. १७व्या मिनिटाला लेऑनने बायर्नचे खाते खोलल्यानंतर त्यांना दुसऱ्या गोलसाठी ४१व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. म्युलरच्या या गोलनंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच लेव्हानडोवस्कीच्या गोलमुळे बायर्नने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. पण मार्टिनने ५२व्या आणि ५५व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण बायर्नने आणखी दोन गोल करत हा सामना जिंकला.

रविवारी संध्याकाळी झालेल्या सामन्यात, ऑग्सबर्गने शाल्केचे आव्हान ३-० असो मोडीत काढले. एडवर्ड लोएन (सहाव्या मिनिटाला), नोहा जोएल सारेनरेन बाझी (७६व्या मिनिटाला) आणि सर्जियो कोडरेव्हा (९१व्या मिनिटाला) यांनी गोल करत ऑग्सबर्गला विजय मिळवून दिला.

तीन फुटबॉलपटूंना करोनाची बाधा

लंडन :इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगच्या मोसमाला सुरुवात होण्याआधीच अनेक फुटबॉलपटूंना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. रविवारी दोन खेळाडूंना तसेच बॉर्नेमाऊथच्या एका खेळाडूला करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांत ९९६ खेळाडू आणि क्लबच्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोघांना करोना झाल्याचे निदान समोर आले आहे. त्याचबरोबर बॉर्नेमाऊथच्या एका खेळाडूलाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रीमियर लीगच्या हंगामाला पुन्हा प्रारंभ करण्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. यापूर्वी बुंडेसलिगातील डायनॅमो ड्रेस्डन संघातील खेळाडूंनाही करोनाची लागण झाली होती.