बायर्न म्युनिकने गोलांचा चौकार लगावत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात बार्सिलोनाचा धुव्वा उडवला. बायर्न म्युनिकने घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ४-० असा विजय मिळवून सलग चार वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.
स्पॅनिश लीगमध्ये आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाचा १९९७नंतरचा हा पहिलाच दारुण पराभव आहे. १९९७मध्ये त्यांना डायनामो किएव्हने ४-० असे हरवले होते. जर्मनीचा स्टार खेळाडू थॉमस म्युलर बायर्न म्युनिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल करत त्याने विजयात मोलाचा हातभार लावला. मारियो गोमेझ आणि आर्येन रॉबेन यांनी केलेल्या गोलमुळे आता १ मे रोजी कॅम्प न्यू येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यासाठी बायर्न म्युनिकने मजबूत आघाडी घेतली आहे.
बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याला मांडीच्या स्नायूच्या दुखापतीने सतावले होते. तरीही या सामन्यात तो उतरला होता. पण जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब पटकावणाऱ्या मेस्सीला आपली छाप मात्र पाडता आली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच पेनल्टी-किकचा बायर्नचा अपील पंचांनी फेटाळून लावला. पण रॉबेनच्या क्रॉसवर म्युलरने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवून २४व्या मिनिटाला बायर्न म्युनिकचे खाते खोलले. बार्सिलोनाची बचावफळी भेदून गोमेझने ४९व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे म्युनिकने आघाडी २-० अशी वाढवली. गेल्या तीन सामन्यांमधील गोमेझचा हा सहावा गोल ठरला.
रॉबेनने आक्रमक चाली करत बार्सिलोनाच्या बचावपटूंसमोर वेळोवेळी आव्हान निर्माण केले होते. अखेर ७३व्या मिनिटाला गोल करण्याची संधी त्याने साधली. जॉर्डी अल्बाकडे पास देण्याऐवजी स्वत:चे कौशल्य पणाला लावत रॉबेनने बार्सिलोनाचा गोलरक्षक विक्टर वाल्डेस याला चकवून तिसरा गोल केला. ८२व्या मिनिटाला फ्रँक रिबरी आणि डेव्हिड अलाबा यांना आक्रमण चढवल्यानंतर बार्सिलोनाच्या बचावफळीतील कच्चे दुवे पुन्हा एकदा समोर आले. यावेळी म्युलरने दुसरा गोल करत बायर्न म्युनिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.