यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बायर्न म्युनिकने बोरुसिया डॉर्टमंडला नमवत जर्मन चषकाच्या जेतेपदावर कब्जा केला. अतिरिक्त वेळेत अर्जेन रॉबीन आणि थॉमस म्यूलर यांच्या गोलच्या जोरावर बायर्नने बोरुसियावर २-० असा विजय मिळवला. प्रशिक्षक पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना बायर्नने यंदाच्या हंगामात पटकावलेले हे चौथे जेतेपद आहे. याआधी त्यांनी बुंडेसलिगा चषक, क्लब विश्वचषक आणि युएफा सुपर चषकाच्या जेतेपदावर नाव कोरले होते. बायर्न म्युनिकचे जर्मन चषकाचे हे १७वे जेतेपद आहे. यंदाच्या हंगामात चॅम्पियन्स लीग सोडून सर्व महत्त्वाच्या जेतेपदांवर बायर्न म्युनिकने आपल्या नावाची मोहोर उमटवत वर्चस्व गाजवले आहे.
पोटाला झालेल्या दुखापतीमुळे बायर्नचा मुख्य खेळाडू डेव्हिड अलाबा या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी रफिन्हाला संधी मिळाली. याआधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅस्टिअन श्वानस्टायझर तर मारिओ मंडझुकिकला वगळण्यात आल्याने बायर्नचा संघ कमकुवत झाला होता. मात्र गार्डिओला यांनी ३-४-३ अशी व्यूहरचना आखताना १८ वर्षीय युवा खेळाडू पिअर इमिली होइबजर्गला संधी दिली. बोरुसियातर्फे शेवटची लढत खेळणाऱ्या रॉबर्ट लेव्हानडोअस्कीने गोलसाठी झुंजार प्रयत्न केले, मात्र ते अपुरेच ठरले.
बायर्न म्युनिकच्या झंझावाती आक्रमणाला रोखण्यासाठी बोरुसियाने अचूक रणनीती आखल्याने निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. बायर्नच्या खेळाडूंनी विविध पद्धतीने चेंडूवर ताबा मिळवत गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र बोरुसियाने बचाव पक्का करत त्यांना रोखले. बोरुसियाकडून गोल झाला नाही, तरी फुटबॉलरसिकांना थरारक खेळाची पर्वणी मिळाली. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत बोरुसियाविरुद्ध बायर्नतर्फे रॉबीननेच निर्णायक गोल गोल केला होता. या सामन्यातही रॉबीननेच अतिरिक्त वेळेत गोल करत बायर्नचे खाते उघडले. यानंतर काही मिनिटांतच बोरुसियाच्या थकलेल्या खेळाडूंना चकवत थॉमस म्यूलरने सुरेख गोल केला.