बांगलादेश क्रिकेटची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेश क्रिकेट बोर्डाने(बीसीबी) दोन क्रिकेट क्लब, त्यातील खेळाडू, मॅनेजर आणि पंचांवर कारवाई करत बंदी घातली आहे. बांगलादेशचा गोलंदाज सुजोन महमूद यानने केवळ ४ चेंडूंमध्ये ९२ धावा दिल्याची बातमी क्रिकेट विश्वात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक केली होती. सुजोन याने लालमाटिया क्लबकडून खेळताना एक्सियोम क्लब विरुद्धच्या सामन्यात पक्षपाती निर्णयावरून पंचांवर नाराज होऊन त्याने मुद्दाम असे केल्याचे चौकशीअंती समोर आले.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, याआधी फिअर फायटर्स स्पोर्टिंग क्लबच्या तस्नीम हसननेसुद्धा पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन प्रतिस्पर्धी संघाला १ षटकात ६९ धावा दिल्या होत्या. यावेळी सुजोन याने पंचांच्या पक्षपाती निर्णयाचा निषेध म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ९६ धावा आंदण म्हणून दिल्या. दोघांवरही बांगलादेश क्रिकेटची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली १० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधिक क्रिकेट क्लबवरही बंदीची कुऱ्हाड आली आहे. दोन्ही संघांना ढाका लीगमध्ये सहभागी होता येणार नाही. याशिवाय, दोन्ही संघांच्या मॅनेजर आणि प्रशिक्षकांवर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

सामन्यादरम्यान परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी पंचांवरही सहा महिन्यांची बंदी घातली. घडलेल्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीतील सदस्य असलेल्या शेख सोहेल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघांच्या प्रत्येक खेळाडूची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. सुजोन आणि तस्नीम यांनी संघ व्यवस्थापनाने दिलेल्या सुचनांवरून प्रतिस्पर्धी संघाला धावा आंदण दिल्या हे चौकशीत स्पष्ट झाल्याचे शेख यांनी सांगितले.

”दोन्ही क्रिकेट क्लबने जाणूनबुजून बांगलादेश क्रिकेटची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. असं करणं हा गुन्हा असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.”, असे शेख म्हणाले.