भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जोहरी यांनी काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. जोहरी यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. तथापि, मंडळाने त्याला अंतरिम मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला होता.

जोहरी यांची २०१६ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. “त्यांचा राजीनामा आज (गुरूवार) स्वीकारण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा दिला होता. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयला त्यावर निर्णय घेता आला नव्हता. परंतु आता त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आलं आहे,” अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

दरम्यान, राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयचं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद रिक्त झालं आहे. त्या जागी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयवर प्रशासक (सीओए) नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संतोष रांगणेकर यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिली होता. त्यानंतर बीसीसीआयनं मुख्य वित्तीय अधिकाऱ्याशिवाय आपलं काम सुरू ठेवलं आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर जोहरी अनेक आघाड्यांवर काम केलं होतं. त्यामध्ये त्यांनी आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार इंडियाला १६ हजार ३४८ कोटी रुपयांना विकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शशांक मनोहर हे बीसीसीआय अध्यक्ष होते आणि अनुराग ठाकूर हे मंडळाचे सचिव होते तेव्हा त्यांची जोहरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.