भारतीय संघ महिला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर झाला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा इंग्लंडने पराभव केला. या सामन्यात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते. या विषयी मिताली राज हिने BCCI च्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली होती. मात्र हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत कसे काय पोहोचले? असा सवाल BCCI चे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

मिताली राज हिने या प्रकरणाबाबत संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांच्यावर एका पत्रातून आरोप केले आहेत. ‘काही लोकं मला संपवायला टपले आहेत’, असा घणाघाती आरोप करत रमेश पोवार यांनी माझा अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र हे पत्र मितालीने केवळ BCCI चे CEO राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना लिहिले होते. तर मग हे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये लीक कसे काय झाले? अशी विचारणा चौधरी यांनी जोहरी आणि साबा करीम यांना लिहिलेल्या मेलद्वारे केली आहे. पत्रातील मजकूर हा अतिशय संवेदनशील आणि BCCI ची प्रतिमा मलीन करणारा होता. अशा वेळी हे पत्र मीडियाला कसे काय मिळाले? असा सवाल त्यांनी या दोन अधिकऱ्यांना विचारला आहे.

प्रशिक्षक रमेश पोवार यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला संघाबाहेर ठेवले. हरमनप्रीतशी माझे काहीही भांडण नाही. पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले. त्यात भर म्हणून माजी कर्णधार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांनी माझ्याविरोधात आपल्या पदाचा गैरवापर केला आणि मला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला एकप्रकारे सहकार्यच केले, असाही आरोप तिने केला.

भारतीय महिला संघ हा यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. त्यानुसार साखळी फेरीत भारताने ४ पैकी ४ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण साखळी फेरीच्या चौथ्या सामन्यात आणि उपांत्य फेरीत भारताची सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि भरवशाची फलंदाज असलेली मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते.