पंडय़ा-राहुल प्रकरणामुळे प्रशासकीय समितीचा निर्णय

नवी दिल्ली : हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी महिलांविषयी केलेल्या अश्लिल शेरेबाजीनंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीने भारतीय संघातील खेळाडूंना आता वर्तणुकीविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.

भारताचा वरिष्ठ संघ, अ संघ तसेच १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ‘‘भारतीय खेळाडूंना बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्तणुकीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. खेळाडूंना वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्याचे मार्गदर्शन यात केले जाणार आहे. त्याचबरोबर लैंगिक समानतेविषयीही सत्राचे आयोजन करण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

या कार्यक्रमाला पंडय़ा आणि राहुल यांची उपस्थिती असणार नाही. या दोघांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही युवा खेळाडूंसह वरिष्ठ खेळाडूंसाठी हे मार्गदर्शन शिबीर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.