भारतीय संघाच्या प्रशिक्षपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले
भारतीय संघाच्या प्रशिक्षपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. या पदासाठी तब्बल नऊ निकष बीसीसीआयने निश्चित केले आहेत. त्यानुसार प्रशिक्षक हिंदी बोलता येणारा असावा अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली आहे. या अटीमुळे भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक भारतीय व्यक्तीच असेल यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी प्रशिक्षकपदासाठी २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात एक जून रोजी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठीचे अर्ज खुले केले. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १० जून आहे. बीसीसीआयच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी संघ संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात संजय बांगर (फलंदाजी प्रशिक्षक), भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) तर आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) म्हणून काम पाहत होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकासह या चौघांचे करार संपले. भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र अद्यापही पूर्णवेळ प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बांगर यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे.