01 October 2020

News Flash

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी BCCI क्युरेटर पाठवणार, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नाराज

खेळपट्टीची जबाबदारी आम्ही घेणार नाही - निरंजन शहा

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेला अवघे २ दिवस शिल्लक राहिलेले असताना बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये वादाची नवीन ठिणगी पडली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने, विंडीजविरुद्धच्या सामन्यात खेळपट्ट्या वेगवान आणि उसळत्या बनवण्याची मागणी केली होती. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआय दलजित सिंह, विश्वजीत पडीयार या क्युरेटरना राजकोटला खेळपट्टीची बनवण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी पाठवलं आहे. मात्र सामना सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चांगलीच नाराज झाली आहे. ४ ऑक्टोबरपासून राजकोट येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

“बीसीसीआय ज्या पद्धतीने वागत आहे, त्यामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे खेळपट्टी बनवणारे प्रगत क्युरेटर काम करतात. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बीसीसीआयशी अनेक वर्षांपासून संलग्न आहे. गेली अनेक वर्ष आम्ही आमच्या मैदानावर सामने भरवले आहेत. अशावेळी बीसीसीआय स्वतःचे क्युरेटर खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाठवतंय, हे चुकीचं आहे. सामन्यानंतर आयसीसीने खेळपट्टीबद्दल आक्षेप घेतले, तर त्याची जबाबदारी बीसीसीआयची असेल. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याला जबाबदार राहणार नाही.” सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशने सदस्य निरंजन शहा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपलं मत मांडलं.

आतापर्यंत ज्या मैदानावर सामना भरवला जातो, त्या संघटनेचे क्युरेटर हे खेळपट्टी बनवतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयने खेळपट्टीच्या देखभालीसाठी स्वतःचे क्युरेटर पाठवायला सुरुवात केली आहे. “जर बीसीसीआयला खेळपट्ट्यांची इतकीच चिंता असेल तर प्रत्येक मैदानासाठी त्यांनीच क्युरेटरची नेमणूक करावी, मग स्थानिक लोकांची गरजच भासणार नाही. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींपेक्षा स्थानिक क्युरेटरना मैदानाची जास्त माहिती असते. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला खेळपट्टी बनवता येते.” त्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय आपल्याला पटलेला नसल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 1:35 pm

Web Title: bcci airdrops curators at rajkot saurashtra cricket association cries foul
टॅग Bcci
Next Stories
1 IPLदरम्यान धोनीच्या खोलीत रंगते ‘हुक्का पे चर्चा’!
2 Vijay Hazare Trophy 2018-19 : ‘या’ कारणासाठी दीडशतक झळकावल्यानंतर गंभीरने सोडली फलंदाजी
3 शास्त्री गुरुजींच्या चौकडीत आणखी एका प्रशिक्षकाची भर?
Just Now!
X