२०१७ वर्षात घरच्या मैदानावर बहुतांश प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झालेला आहे. ५ जानेवारीपासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा ३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने आज वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहलीचं वन-डे संघात कर्णधार म्हणून पुनरागमन झालं आहे. याचसोबत मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही राखीव सलामीवीराच्या भूमिकेत संघात जागा मिळाली आहे. परदेशी खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेची कामगिरी लक्षात घेता त्याला संघात जागा मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याव्यतिरीक्त टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करुनही लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध संघात जागा मिळू शकलेली नाहीये, तर दुसरीकडे श्रेयस अय्यर, मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांनी संघात आपली जागा कायम राखलेली आहे.

निवड समितीने यावेळीही यो-यो टेस्ट पास झालेल्या युवराज सिंह, सुरेश रैना यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळू शकलेली नाहीये. तर फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाही संघात जागा मिळवू शकले नाहीयेत. या दोघांच्या जागी निवड समितीने युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर आपला विश्वास दाखवला आहे. याव्यतिरीक्त अक्षर पटेलचीही संघात निवड करण्यात आलेली आहे.

असा असेल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार,  शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.