भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या २०१७/१८ च्या हंगामाची घोषणा करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात एकूण २८ संघ खेळणार असून, या संघाची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात ७ संघांचा समावेश असेल.

यंदाच्या रणजी हंगामाची सुरुवात ही ६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. प्रत्येक संघ हा यंदाच्या साखळी फेरीत २ सामने कमी खेळणार आहे. खेळाडूंवर येणारा अतिरीक्त ताण टाळण्यासाठी यंदा बीसीसीआयने स्पर्धेच्या स्वरुपात काही बदल केले आहेत. ४१ वेळा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम करणारा मुंबईचा संघ यंदा ‘क’ गटात असून साखळी सामन्यात मुंबईला अनेक तुल्यबळ संघांचा सामना करावा लागणार आहे. तसेच प्रत्येक संघातील खेळाडूंना पुरेसा आराम मिळावा, यासाठी प्रत्येक सामन्यानंतर ४ दिवसांची विश्रांती ठेवण्यात आली आहे.

अशी आहे यंदाच्या रणजी हंगामातली संघांची विभागणी –

अ गट – कर्नाटक, आसाम, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, रेल्वे

ब गट – झारखंड, गुजरात, सौराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मिर

क गट – मुंबई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बडोदा, ओडीशा

ड गट – हिमाचल प्रदेश, विदर्भ, पंजाब, बंगाल, सेनादल, गोवा, छत्तीसगड

गुजरातने मागच्या वर्षी अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करत रणजी करंडकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या हंगामात उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने हे ७ ते ११ डिसेंबर, उपांत्य फेरीचे सामने १७ ते २१ डिसेंबर, आणि अंतिम सामना हा २९ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. यंदा बीसीसीआयने दुलीप करंडकाची स्पर्धा रद्द केलेली आहे. त्यामुळे यंदाचा रणजी हंगाम हा अधिक चुरशीचा होईल, अशी आशा बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.